स्व.विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमाला पुष्प-४ थे निरोगी जीवनशैलीसाठी सकस आहार,व्यायाम, मानसिकता,स्वच्छता आणि नियमितता या पंचसूत्रीचा अवलंब करणे हीच दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे – डॉ. राम जावळे स्वास्थ्य म्हणजे शारीरिक,मानसिक आणि सामाजिक कल्याणाची परिपूर्ण अवस्था – डॉ.दिनकर राऊत


केज/प्रतिनिधी
आधुनिक जीवनशैली मुळे अनेक लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.अनियमित दिनचर्या,ताणतणाव, अपूर्ण झोप आणि असंतुलित आहार यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.तेंव्हा आपले आरोग्य आपल्या हाती ठेवण्यासाठी दररोज नियमितव्यायाम, संतुलित व पोषक आहार, ७ ते ८ तासांची शांत झोप,आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच ताणतणाव व्यवस्थापन,वैयक्तिक स्वच्छता,सकारात्मक विचार,आणि वर्षातून एकदा नियमित शरीर तपासणी करून तुम्ही निरोगी जीवनशैली जगू शकता.तेंव्हा निरोगी जीवनशैलीसाठी सकस आहार, शारीरिक हालचाल,सकारात्मक मन,स्वच्छता आणि नियमित दिनचर्या या पंचसूत्रीचा अवलंब करणे हीच दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन लातूर येथील डॉ.राम जावळे यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि.२३ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राम जावळे रोगप्रतिबंधन तथा जनरल सर्जन, जिजामाता आरोग्यालय, हॉस्पिटल,लातूर तर अध्यक्ष म्हणून डॉ. दिनकर राऊत बालरोग तज्ञ,योगिता हॉस्पिटल केज हे उपस्थित होते. इतर उपस्थित मान्यवरां मध्ये जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे सचिव जी.बी.गदळे,सह सचिव उपेंद्र कोकिळ, ज्येष्ठ पत्रकार दिपकराव देशपांडे,एम.डी.घुले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय बालकृष्ण चोले यांनी दिला.चौथे पुष्प गुंफताना आपले आरोग्य आपल्या हाती कसे घ्यावे ? या विषयावर बोलताना डॉ. राम जावळे पुढे म्हणाले, आपले आरोग्य आपल्या हाती ठेवण्यासाठी आहार,व्यायाम, मानसिकता,स्वच्छता व नियमितता या पंचसूत्री चा अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे.
संतुलित आहार- दैनंदिन जेवणात पालेभाज्या, फळभाज्या, ताक,दही व पाण्याचे प्रमाण जास्त असावे.उलट पोळी,भात, भाकरी यांचे प्रमाण कमी असावे.तसेच साखरेचे पदार्थ मर्यादित खावेत.
व्यायाम- सकाळचा व्यायाम जास्त महत्त्वाचा असतो.योगासने,सूर्य नमस्कार,चालणे, दोरीवरच्या उड्या,पोहणे यासारखे व्यायाम शरीराला ताजेतवाने ठेवतात.त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते,स्नायू मजबूत होतात आणि वजन नियंत्रणात राहते.
मानसिकता- ताणतणाव टाळून नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा, मानसिक शांततेसाठी ध्यान,प्राणायाम किंवा श्वसनाचे व्यायाम करावेत.मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी आवडते छंद जोपासले पाहिजेत.
स्वच्छता-स्वच्छता ही विचारांची हवी.चांगले विचार व योग्य कृती असली पाहिजे.
नियमितता- नियम हे काटेकोरपणे पाळले पाहिजेत.कारण औषधांपेक्षा नियम हे जास्त महत्त्वाचे असतात.शेवटी ते म्हणाले की,आजारांचा विचार करण्यापेक्षा तुम्ही शारीरिक सुदृढता वाढवली पाहिजे.
कार्यक्रमाच्या पुढील सत्रामध्ये उपस्थित श्रोत्यांनी आरोग्यविषयक विचारलेल्या प्रश्नांचे समर्पक पद्धतीने डॉ.राम जावळे यांनी निराकरण केले.अध्यक्षीय समारोपात डॉ.दिनकर राऊत म्हणाले की, सध्याच्या या धावपळी च्या युगामध्ये प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. भविष्यकाळाचा विचार करून तुम्ही वर्तमान काळात खूप चुका करताय.स्वास्थ्य म्हणजे जो स्वतःमध्ये स्थिर आहे.आणि अस्वस्थ म्हणजे तो स्थिर नसणे. थोडक्यात स्वास्थ्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची परिपूर्ण अवस्था होय.
महायुद्धापेक्षा जास्त मानवहानी ही कोविड मध्ये झाली.कारण सर्व आजारांचे उगम म्हणजे ट्रेस फॅक्टर आहे.पुढे ते म्हणाले की,ज्यांनी सकारात्मक विचार स्वीकारले,त्यांनी अलौकिक कार्य केले. याप्रसंगी त्यांनी तथागत गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अनेक जगप्रख्यात वैज्ञानिकांच्या कार्यांची उपस्थितांना आठवण करून दिली.कार्यक्रमाचे सुञसंचलन भालचंद्र केजकर यांनी केले तर आभार रघुनाथ चौरे यांनी मानले.शेवटी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.



