
केज/प्रतिनिधी
सततचा दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप २०२५ च्या पीक विमा योजनेत जिल्ह्याचा पुन्हा समावेश करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात केज तालुका प्रमुख पृथ्वीराज (अण्णासाहेब) सुरेश तात्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले निवेदन तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका
निवेदनात नमूद केल्या नुसार,मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्हा हा नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत असतो.गेल्या खरीप २०२५ हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि महापूर आले होते. यामध्ये शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली,ज्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.अशा गंभीर परिस्थितीत बीड जिल्ह्याला पीक विमा योजनेतून वगळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज
ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ या दृष्ट चक्रात अडकलेल्या बीडच्या शेतकऱ्याला आर्थिक आधाराची नितांत गरज आहे.पिके वाहून गेल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या अडचणीत सापडला असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
खरीप २०२५ पीक विमा योजनेतून वगळलेल्या बीड जिल्ह्याचा या योजनेत तातडीने पुन्हा समावेश करावा. संबंधित विभागाला यावर कार्यवाही करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावे,अशी आमची नम्र विनंती आहे,असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केले.शिवसेनेच्या या निवेदनावर यांच्या स्वाक्षरी आहेत. दादासाहेब ससाणे विधानसभा प्रमुख, दत्तकुमार आश्रुबा काकडे(युवासेना तालुका प्रमुख) महेंद्र पुंडलिक चाटे(उपतालुका प्रमुख) विकास कारभारी काशिद (तालुका सचिव) प्रकाश मुंडे, योगेश देशमुख, सुग्रीव बसवर, प्रकाश रोमन,विश्वास जाधव,उमेश चाळक, गोपाळ आश्रुबा शिंदे, विकास सुरेश गालफाडे माणिक शंकर गालफाडे,सुनील अर्जुन जावळे,रफिक शेख यांच्या स्वाक्षरी आहेत.



