सामाजिक

स्व.विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यान माला : पुष्प- ३ रे प्रत्येक स्त्रीमध्ये माया, शक्ती,बुद्धी आणि करुणेचा संगम असतो -डॉ.मधुश्री सावजी स्त्रीची सक्षमता ही चारित्र्यात असते – दिपालीताई काटे 

केज/प्रतिनिधी

स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते मानव जातीचे अस्तित्व स्त्री पासून आहे.सृष्टीचे अस्तित्व निरंतर टिकवून ठेवणे ही महत्वपूर्ण जबाबदारी निसर्गाने स्त्री वर सोपविली आहे. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये स्त्रीचे महत्व अधोरेखीत करतांना असे म्हटले जाते की,यत्र नारायणीस्तु पुजन्ते रमन्ते तत्र देवता” म्हणजे जिथे स्त्रियांची पुजा केली जाते तेथे देवता वास करतात.श्रद्धा हे रूप स्त्रीचे व विश्वास हे रूप पुरुषाचे आहे.देव देवतांच्या नावांमध्ये देखील पहिले स्थान स्त्रीचे आहे जसे लक्ष्मी नारायण,राधाकृष्ण, सीताराम, सिद्धिविनायक अर्थात स्त्री ही परमसत्ता आहे,त्यामुळे स्त्री ही खूप सक्षम आहे.स्त्रीचे अनेक रूपे आहेत.

स्त्रीशक्ती, सामर्थ्य,धैर्य आणि विविध गुणांचे प्रतीक मानले जातात.प्रत्येक स्त्रीमध्ये माया,शक्ती, बुद्धी आणि करुणेचा संगम असतो असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. मधुश्री संजीव सावजी यांनी केले.केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि. २३ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.मधुश्री संजीव सावजी,अखिल भारतीय मंत्री,विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान या उपस्थित होत्या.तर अध्यक्षा म्हणून सौ. दिपालीताई काटे प्रवचनकार तथा ज्ञानेश्वरी अभ्यासक, रामकृष्ण परमहंस परिवार केज यांनी उपस्थिती दर्शवली.इतर उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ.हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदी उपस्थित होत्या.

कार्यक्रमासाठी लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय गौरी जगताप यांनी दिला. तिसरे पुष्प गुंफताना “महिला सक्षम असतातच ” याविषयावर बोलताना डॉ.मधुश्री सावजी पुढे म्हणाल्या की,पद,पैसा,प्रतिष्ठा हे केवळ प्रसिद्धीचे स्वरूप आहे,आपल्या माघारी आपली जी चर्चा होते ती खरी कीर्ती होय.स्त्री मुलगी,पत्नी या भूमीकेतून जाते,म्हणजे तिला कुलवती असे म्हटले जाते.म्हणजे ती दोन कुलांची कीर्ती अर्थात किर्तीवंत होते. शेवटी त्या म्हणाल्या की, भारतीय परंपरेनुसार स्त्रियांनी शरीर संपन्न ठेवले पाहिजे.ते सुरक्षित लढाऊ व सक्षम असले पाहिजे.तसेच वाणी ही संताप्रमाणे सकारात्मक असली पाहिजे. पुरुषांच्या मृत्यूनंतरही स्त्री वैद्यक्यामध्ये ( विधवात्व ) जीवन जगण्यासाठी सक्षम आहे.म्हणजे ती सृजनशील आहे.तिच्या मध्ये उत्तम विवेकी निर्णय घेण्याची क्षमता आहे.

अध्यक्षीय समारोपात दिपालीताई काटे म्हणाल्या की,अशा व्याख्यानमालेच्या माध्यमातून स्व: स्वरूपाची आपल्याला खऱ्या अर्थाने जाण होते. सक्षमत्व ही गोष्ट मनाशी निगडित आहे.प्रकृती व पुरुष हे मूळ संस्कृतीचे दोन भेद आहेत.समस्त विश्वाला धारणकरण्याची क्षमता प्रकृतीमध्ये आहे व त्याचा निर्माता पुरुष आहे.त्याचप्रमाणे नव निर्मितीची शक्ती स्त्री मध्ये देखील आहे.आणि स्त्री ची सक्षमता ही चारित्र्यात असते. छत्रपती शिवरायांना घडविण्याचे सामर्थ्य माँ जिजाऊ मध्ये होती. शेवटी त्यांनी अल्पायुषी परंतु स्थिर अंतकरण असलेल्या सत्यवानाशीच सावित्रीने विवाह करून तिने तिची सक्षमता कशी सिद्ध केली याविषयी सखोल असे विवेचन केले.कार्यक्रमाचे सुञ संचालन सुरेखा डांगे यांनी केले तर आभार प्रतिक्षा गुंड यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!