सामाजिक

स्व.विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमाला  पुष्प- १ ले संतवाङमय मानवाला बाह्य जगतापेक्षा अंतर्मुख होऊन स्वतःचा शोध घेण्यास प्रवृत्त करते – ह.भ.प.प्रणव महाराज पटवारी

केज/प्रतिनिधी

संतवाङमय हे केवळ धार्मिक नसून ते मानवी मूल्यांचे संवर्धन करणारे एक समाजशास्त्र आहे. साक्षर असणे म्हणजे सुशिक्षित असणे नव्हे, संत हे साक्षर नसले तरी ते सुशिक्षित होते.वर्तमान काळातील हिंसक आणि स्वार्थी मानसिकतेला योग्य दिशा देण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. पूर्वी ज्ञानाची प्रचंड भूक होती,परंतु पर्यायी साधने उपलब्ध नव्हती.दुर्मिळ गोष्ट मिळवायला कष्ट लागते.

संतवाणीतूनच शुद्ध आचरण कसे असावे हे स्पष्ट होते. काळ कुठलाही असो संतांची प्रासंगिकता कायम तीच राहते. कारण माध्यम जरी बदलली तरी नैतिक मूल्यांची आवश्यकता बदलत नाही.संतवाङमय हे अनुभवातून निर्मिलेले साहित्य आहे.तसेच संत साहित्य हे मानवाला बाह्य जगतापेक्षा अंतर्मुख होऊन स्वतःचा शोध घेण्यास प्रवृत्त करते असे प्रतिपादन ह.भ.प.प्रणव महाराज पटवारी यांनी केले.केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि.२० एप्रिल वार सोमवार पासून स्व.विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यान मालेला नुकतीच सुरुवात झाली. यावर्षी याव्याख्यानमाले ने २६ व्या वर्षात पदार्पण केले.तेंव्हा या व्याख्यान मालेचा शुभारंभ प्रमुख वक्ते ह.भ.प.प्रणव महाराज पटवारी कवी, लेखक,प्रबोधनकार, माजलगाव यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलनाने झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प.केशव महाराज शास्त्री भगवान श्रीकृष्ण आश्रम बीड रोड केज हे उपस्थित होते. इतर मान्यवर उपस्थिती मध्ये संस्थेचे सचिव जी. बी.गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ,कोषाध्यक्ष फजीलोद्दीन काजी, संस्थेचे जेष्ठ संचालक युवराज दादा काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव जी.बी.गदळे यांनी दिला. याप्रसंगी ते म्हणाले की, स्व.विश्वंभर कोकीळ यांच्या संकल्पनेतून या व्याख्यानमालेची सुरुवात झाली.आज या व्याख्यानमालेने २६ व्या वर्षात पदार्पण केलेआहे. या व्याख्यानमालेमध्ये संबंध महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यात्यांना निमंत्रित केले जाते.या व्याख्यानमालेने समाजाच्या विविध विषयांना स्पर्श करण्यासाठी एक व्यापक अशी अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे.

पहिले पुष्प गुंफताना ” वर्तमान युगातील संत वाङ्मयाची प्रासंगिकता ” या विषयावर बोलताना ह.भ.प.प्रणव महाराज पटवारी पुढे म्हणाले की, समाजप्रबोधनासाठी अशी व्याख्याने आयोजित करणे अत्यावश्यक आहे.यातून जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते.तसेच जीवनातील अनंत अडचणींना सामोरे जाण्याचे बळ ही मिळते. वर्तमान युगामध्ये जिथे मानवी जीवन भौतिकता, ताण तणाव आणिनैतिक मूल्यांच्या ऱ्हासाकडे झुकत आहे,तिथे संत संतवाङ्मय अत्यंत प्रासंगिक आणि मार्गदर्शक ठरत आहे. संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत तुकाराम अशा अनेक संतांनी रचलेले साहित्य आजही जीवनदायी ठरत आहे.

याप्रसंगी असंख्य श्रोत्यांनी उपस्थिती दर्शवली तसेच पत्रकार बंधूही मोठ्या संख्येने उपस्थित होते.अध्यक्षीय समारोपात ह.भ.प. केशव महाराज शास्त्री म्हणाले की,आजच्या या धावपळीच्या युगात अभंगवाणी आणि कीर्तनाच्या माध्यमातून मानसिक शांती मिळते. संतांनी जात धर्म आणि वर्गभेद झुगारून माणुसकीला प्रतिष्ठा दिली.अर्थात संतांनी कसे जगायचे ही शिकवण जगाला दिली.शेवटी त्यांनी सर्व जगाला शांतीचा मंत्र देणारे गौतम बुद्धांची महती विषद केली.कार्यक्रमाचे सुञसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले तर आभार भालचंद्र केजकर यांनी मानले.शेवटी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!