अक्षय तृतीयाच्या दिवशी भेंडवळ येथील घट मांडणीचा अंदाज प्रसारित,जून महिन्यात मुसळधार पाऊस,महापूर येणार ; देशाची संरक्षण स्थिती ताण तणावात, राजा कायम रहाणार

बीड/प्रतिनिधी
मागील ३५० वर्षांपासून प्रसिद्ध असलेली भेंडवळ च्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे.परवा अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घट मांडणी करण्यात आली व काल सकाळी सूर्योदयाच्या वेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थिती बद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले.यावेळी भेंडवळ परिसरासह मराठवाडा खान्देश व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. भेंडवळच्या घट मांडणी तून मिळालेल्या अंदाजा नुसार शेतकरी वर्षभराचं आपल्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. भेंडवळची घटमांडणी ही स्थानिक परंपरा असून अनेक शेतकरी त्यावर विश्वास ठेवत असतात. दै.स्वाभिमानी न्युज मात्र भेंडवळच्या घटमांडणी तून निघालेल्या अंदाजाची पुष्टी करत नाही.यंदाच्या घटमांडणी तून निघालेले प्रमुख निष्कर्ष पुढील प्रमाणे आहेत.
पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल.कापूस, तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर.ज्वारी,तूर,मुग, उडीद,मटकी,जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील. तीळ,बाजरी हे पीक भरपूर येईल.देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल परंतु राजा कायम असेल ,देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही.पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये कमी असेल.अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार.
काय आहे भेंडवळ भविष्यवाणी?
पर्जन्यमान,पिकांची स्थिती,शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळ मध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे.गेल्या ३५० वर्षांपासून या घटमांडणी च्या आधारावर वर्षभराचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचे भविष्य वर्तवले जात आहे.शेती आणि पर्जन्य विषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीया याकाळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते.३५० वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती,आणि आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत.
घटमांडणी नेमकी कशी करतात?
भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे.शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो.घटात चार मातीची ढेकळे,त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड,भजी, वडा, सांडोई,कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध १८ प्रकारची धान्ये मांडली जातात.घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू,ज्वारी,तूर,उडीद,मूग, हरभरा,जवस,तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी,तांदूळ,अंबाडी, सरकी,वाटाणा ही धान्ये मांडली जातात.
शेतकरी यावर विश्वास का ठेवतात आणि शेतकऱ्यांसाठी भाकीत महत्त्वाचे का?
घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाड्या सह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात,या परिसरात हजारोंच्या संख्येने शेतकरी एकत्रित जमतात.शेतकरीच नव्हे तर बी-बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात.शेतकरी वर्ग घट मांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची,हे ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणा मुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे. अक्षय तृतीयेच्या भेंडवळ येथील घट मांडणी कडे नागरिक मोठ्या अपेक्षेने वाट पहात असतात.



