गुन्हेगारीसामाजिक

धक्कादायक घटना ! विद्युत टॉवरची तार चोरताना टॉवर कोसळला,पुण्याच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू अपघाताचा बनाव फसला ; मृतदेह परभणीत नेताच प्रकार उघड

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील नांदूरघाट शिवारात विद्युत टॉवरची तार चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना एक भीषण दुर्घटना घडली.टॉवर अंगावर कोसळल्याने पुण्यातील दोन संशयित तरुणांचा जागीच मृत्यू झाला.दि.२९ मार्च रविवार च्या मध्यरात्री ही घटना घडली असून, मृतांची नावे अविनाश पटोळे आणि आकाश आडे अशी आहेत. दरम्यान,हा प्रकार लपवण्यासाठी साथीदारांनी केलेला रस्ते अपघाताचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहिती नुसार,पुण्याच्या हडपसर भागातील काही तरुण नांदूरघाट शिवारात विद्युत टॉवरच्या तारा चोरण्यासाठी आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अविनाश आणि आकाश हे दोघे टॉवरवर चढून तारा काढण्याचा प्रयत्न करत होते.मात्र,टॉवरचे संतुलन बिघडल्याने अवजड लोखंडी टॉवर थेट खाली कोसळला.या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने दोघांचाही जागीच अंत झाला.

असा फसला साथीदारांचा बनाव

घटनेनंतर घाबरलेल्या इतर साथीदारांनी कायदेशीर कचाट्यातून सुटण्यासाठी एक डाव रचला.त्यांनी दोन्ही मृतदेह एका इर्टिगा कारमध्ये टाकले आणि हा रस्ते अपघात असल्याचे भासवून थेट परभणी गाठली.मात्र, परभणीत पोहोचल्या नंतर कारमधील साथीदार पसार झाले. कार चालक सूरज गिराम याने मृतदेह रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलवण्याचा प्रयत्न केला.मात्र, तरुणांच्या शरीरावरील जखमा आणि कार चालकाची संशयास्पद हालचाल पाहून मृतांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला.अखेर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

तपासाची चक्रे वेगवान

फॉरेन्सिक तपास 

बीड येथील फॉरेन्सिक पथकाने नांदूरघाट शिवारातील घटना स्थळाला भेट देऊन पुराव्यांचे नमुने गोळा केले आहेत.केज पोलिसांनी कार चालक सूरज गिराम याला ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.बेकायदेशीररीत्या विद्युत साहित्याची चोरी करणे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हा केवळ अपघात नसून चोरीच्या उद्देशाने केलेली कृती होती हे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.या प्रकरणा तील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!