सामाजिक

बीडच्या बार्शी नाका चौकात दोन वळूंमध्ये तुंबळ युद्ध,वाहन धारकांची तारांबळ, मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील गजबजलेला भाग असलेल्या बार्शी नाका चौकात रविवारी सकाळी दोन मोकाट वळूंमध्ये जोरदार झुंज पाहायला मिळाली.या दोन जनावरांच्या टकरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून,वाहन चालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला.गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

नेमकी घटना काय?

रविवारी सकाळी नेहमी प्रमाणे बार्शी नाका चौकात वाहनांची मोठी वर्दळ होती.यादरम्यान रस्त्याच्या मधोमध दोन वळू अचानक एकमेकांना भिडले. बराच वेळ ही झुंज सुरू होती.हे वळू एकमेकांवर धावून जात असताना रस्त्यावरून जाणारी दुचाकी,रिक्षा आणि कार यांना मोठा अडथळा निर्माण झाला.अनेक दुचाकीस्वार तर वळूंच्या जवळून जात असताना थोडक्यात बचावले.या प्रकारामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या झुंजीमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांची आणि विशेषतः लहान मुलांची मोठी धांदल उडाली.वळूंची ही धडक इतकी जोरदार होती की, ते कोणत्याही क्षणी रस्त्यावरील वाहनांना धडक देतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती.परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनी आरडा ओरडा करून या वळूंना पांगवण्याचा प्रयत्न केला परंतु बराच वेळ ही जनावरे रस्त्याचा ताबा सोडून हलत नव्हती.

प्रशासनाकडून कारवाई ची मागणी

बीड शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठाण मांडले आहे.यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.बीड नगर पालिकेने या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि त्यांना कोंडवाड्यात हलवावे,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.शहरात मोकाट जनावरांमुळे चालणे कठीण झाले आहे.या घटनेमुळे मोठा अपघात झाला असता तर मोठी आपत्ती झाली असती तरी प्रशासनाने ही जनावरे रस्त्यावरून हटवण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना करावी.- एक त्रस्त नागरिक,बीड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!