युसुफवडगांव येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्यास भाविक भक्तांची अलोट गर्दी, भाविकांनी भरलेल्या मानाच्या १२ गाड्या ओढल्या

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसुफ वडगांव येथे श्रीरामनवमी जन्मोत्सवास सोहळ्यास मोठ्या उत्साहात. सुरुवात झाली. दशरथनंदन श्रीरामचंद्र महाराज की जय असा जयघोष करीत भाविकांनी भरलेल्या १२ गाड्या ओढण्याची परंपरा कायम ठेवली. युसूफवडगांव येथे अतिशय प्राचीन राम मंदीरात प्रभू रामचंद्रा सोबत सीता माता, लक्ष्मण,भरत, शत्रुघ्न, आणि मारुती या देवतांच्या पंचधातुच्या मुर्ती आहेत.
मंदिरात चैत्रशुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केल्यानंतर दशमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले,रामनवमी निमित्त पहाटे सर्व मुर्तींना अभिषेक घालून दुपारी प्रभुरामांची मुर्ती एका सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली.श्रीराम मंदिरात श्रीधर महाराज रामदासी यांचे नारदीय गुलालाचे किर्तन झाले.
दुपारी बारा वाजेच्या सुमारास दशरथनंदन रामचंद्र महाराज की जय असा जयघोष करीत गुलाल पुष्प उधळून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.त्यानंतर गावातून रामचंद्रांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक वेशीमध्ये आल्यावर १२ बैलगाड्या एकमेकांना बांधून भाविकांनी भरलेल्या या गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला.गाड्या ओढण्याचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गावातील व परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.यावर्षी मानाच्या गाड्या ओढण्याचा मान रामभक्त गंपु जंगल घायाळ यांना होता.



