पत्नीच्या खून प्रकरणी पतीला आजन्म जन्मठेप कुऱ्हाडीने वार करून केली होती हत्या

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात घडलेल्या एका थरारक खून प्रकरणात न्यायालयाने आरोपी पतीला आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.पत्नीच्या गळ्यावर आणि छातीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून करण्यात आला होता.विशेष म्हणजे,गुन्हा केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला होता.या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्तीवर दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास भगवान शाहूराव थोरात वय ३३ वर्षे याने त्याची पत्नी आरती भगवान थोरात वय २२ वर्षे हिचा निघृण खून केला. चारित्र्याचा संशय तसेच प्लॉट खरेदीसाठी माहेर हून पैसे आणण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.घरात कोणी नसताना आरोपीने घराबाहेरच पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली.
घटनेनंतर आरोपीने वापरलेली कुऱ्हाड मृतदेहाजवळच टाकून तो थेट युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ अजय पवार यांच्या फिर्यादी वरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात चालले.
सरकारी पक्षाच्या वतीने साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे आरोप सिद्ध करण्यात आले. एकूण नऊ साक्षीदारांच्या साक्षीवर न्यायालयाने विश्वास ठेवला.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी आरोपी भगवान थोरात याला आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.तसेच दहा हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त सहामहिन्यांची शिक्षा ठोठावली.या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यात आला. बचाव पक्षाने अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा दावा केला होता,मात्र तो न्यायालयाने फेटाळला. मृत्यूपूर्वी महिला पतीच्या ताब्यात असल्याच्या मुद्द्यावरही न्यायालयाने भर देत हा निर्णय दिला.
या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील अॕड. राम बिरंगळ आणि त्यांना मदत करणारे सहाय्यक अॕड.रविकुमार उदार यांनी युक्तिवाद केला तर महिला पोलिस भालेराव यांनी परिश्रम घेतले.या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

