प्रति देहू श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील औरंगपुर येथील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन यावेळी पार पडले.तुकोबा,विठोबा आणि ज्ञानोबा यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.
परिसरातील अनेक गावच्या पालख्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या.पंचक्रोशी सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भक्त समुदाय श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावन धाम येथे दर्शनासाठी दाखल झाला होता. अल्पावधीतच प्रति देहू म्हणून ओळख निर्माण केलेले हे पावनधाम भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे.यावेळी बोलताना महंत ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री म्हणाले की, “पावनधाम संस्थान हे सर्वांचे आहे.संततुकाराम महाराजांच्या विचारांवर चालणारी ही संस्था आज सर्वांच्या श्रद्धेचे स्थान बनली आहे.ज्या भाविकांना देहू येथे जाता येत नाही,अशा भाविकांना येथे साक्षात तुकोबारायांचे दर्शन घेण्याची संधी मिळते.
या कार्यक्रमानिमित्त उद्योजक नामदेव इंदरराव गोरे यांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचक्रोशी तील स्वयंसेवकांनी तब्बल सात दिवस अहोरात्र मेहनत घेतली.महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत भक्ति भावाने पार पडला. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.



