तुकोबांच्या भक्ति रंगात पावनधाम न्हाऊन निघणार,अखंड हरिनाम सप्ताह,श्रीमद् भागवत कथा व भव्य गाथा पारायण सोहळ्याची भक्तिमय पर्वणी


केज/प्रतिनिधी
जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त औरंगपूर येथे प्रति देहू श्रीक्षेत्र पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा व भव्य गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा आठ दिवसीय भक्तिमय सोहळा दि.२६ फेब्रुवारी २०२६ गुरुवार रोजी प्रारंभ होऊन दि.०५ मार्च २०२६ गुरुवार रोजी सांगता होणार आहे.या सप्ताहामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, नामस्मरण आणि अध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होणार आहे. सप्ताहाच्या दरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते १२ गाथा पारायण,दुपारी २ ते ५ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ कीर्तन,संगीत भजन व हरिजागर असादैनंदिन कार्यक्रम राहणार आहे.
या सप्ताहात विविध मान्यवर कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे.दि.२६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज हांडे पंढरपूर, दि.२७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर नाशिक, दि.२८फेब्रुवारी रोजी ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा,दि.०१ मार्च रोजी ह.भ.प.श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर यांचे कीर्तन होणारअसून प्रवचन ह.भ.प.देवव्रत राणा महाराज वासकर यांचे राहील.दि.०२ मार्च रोजी ह.भ.प.उमेश महाराज दशरथे आळंदी देवाची यांचे कीर्तन व ह.भ.प.योगी निरंजन नाथजी महाराज विश्वस्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांचे प्रवचन होईल.दि. ०३ मार्च रोजी ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारींगे मुंबई तर दि.०४ मार्च रोजी ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे कीर्तन होईल.व दि. ५ मार्च रोजी महंत ह.भ.प.श्री महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होईल.
त्या नंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री. नामदेवराव इंदरराव गोरे, सुभद्रा इंडस्ट्रीज ग्रुप पुणे व समस्त गोरे परिवार यांच्या वतीने महाप्रसादा ची व्यवस्था करण्यात आली आहे.श्री जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम विश्वस्त मंडळ,प्रति देहू श्रीक्षेत्र पावनधाम, औरंगपूर यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून दि.०५ मार्च २०२६ रोजी संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त परिसरातील गावातून दिंड्या येऊन सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्व भाविकांनी या नामसप्ताहात सहभागी होऊन कीर्तन-भजनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



