
केज/प्रतिनिधी
केज शहरातील महात्मा ज्योतिबा फुले,शिक्षण प्रसारक मंडळ केज संचलित,नालंदा विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नंदकुमार मस्के सर तर प्रमुख पाहुणे म्हणून वाघमारे सर,गरड सर हे उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिन वाघमारे सर यांनी केले.प्रास्ताविका नंतर शाळेतील विद्यार्थीनी कु. शेख जरीया,शेख झैन, आलाट विवेक,बचके आदर्श,मस्के अंकुर, शिरसाट संग्राम,शेख जियान,सय्यद नुमान, इत्यादी विद्यार्थ्यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री.वाघमारे सचिन सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग विद्यार्थ्या समोर मांडले व शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
अध्यक्षीय समारोपात शाळेचे मुख्याध्यापक श्री. नंदकुमार मस्के सर यांनी क्रांतीज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विद्यार्थ्यासमोर मांडला.क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचेनाव खंडोजी नेवसे पाटील असे होते यांचे मुळगाव कटगुन आणि आडनाव हे गोरे होते.महात्मा फुले यांचे वय तेरा वर्ष व सावित्रीबाई फुले यांचे नऊ वर्ष अशा कमी वयामध्येच इसवी सन १८४० मध्ये या दोघांचा विवाह झाला.महिलांचे अज्ञान हे त्यांच्या अडाणी पणामध्येच आहे हे महात्मा फुलेंनी ओळखले म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला घरीच वाचायला लिहायला शिकवले व आपल्याच घरापासून स्त्री शिक्षणाची सुरुवात केली.
वाचायला लिहायला चांगले आल्यानंतर शाळेत जाऊन अध्ययन अध्यापन कशा प्रकारे करावे याचे सखोल प्रशिक्षण व मार्गदर्शन महात्मा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना केले.पेशव्यांनी पुण्या मधील फुल बागेची जमीन महात्मा फुले यांच्या वडिलांना बक्षीस म्हणून दिली होती,त्यामुळे फुले यांचे कुटुंबीय पुणे येथे येऊन राहिले व फुलांचा व्यवसाय करू लागले या व्यवसायावरून त्यांना फुले हे नाव प्राप्त झाले.महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून पुण्यामध्ये दि.१ जानेवारी १८४८ रोजी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. सुरुवातीला या शाळेत ६ मुली होत्या पण पुढेही संख्या १८४८ अखेरपर्यंत ४० ते ४५ पर्यंत जाऊन पोहोचली.आणि या शाळेत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी पार पाडली.
ही शाळा सुरू केल्यानंतर काही कर्मठ सनातनी लोकांनी शाळेला कडाडून विरोध केला.धर्म बुडाला, जग बुडणार, अंगावर शेन, चिखल,व दगड फेकून विरोध केला.पण या विरोधाला न जुमानता ज्ञानदानाचे पवित्र काम त्या करत राहिल्या,प्रसंगी त्यांना घराचा ही त्याग करावा लागला.बाल हत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापनाकेली.सावित्रीबाईंनी हे बालहत्या प्रतिबंध गृह समर्थपणे चालवले. फसलेल्या महिला तरुणी व बलात्काराने पीडित होऊन गरोदर राहिलेल्या महिलांचे,विधवांचे त्या बाळंतपण करत व या बालहत्या प्रतिबंध गृह त्यांना आधार देत व सर्व बालकांना आपलीच मुले मानत.काशीबाई नावाच्या ब्राह्मण महिलेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.
त्या मुलाचे नाव त्यांनी यशवंत ठेवले.त्या मुलाचे अतिशय प्रेमाने पालन पोषण केले त्याचा सांभाळ केला. त्याच्यावर चांगले संस्कार केले.त्याला चांगलेशिक्षण ही दिले व शिक्षण देऊन त्याला एमबीबीएस डॉक्टर बनवले.महात्मा फुले यांनी समाजातील काही चालीरीती,रूढी, परंपरा यांना कडाडून विरोध केला.नाभिक लोकांचा संप घडवून विधवा स्त्रियांचे केशव पण बंद केले.बालविवाह विरोधी मोहीम सुरू केली विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले,सती प्रथेला कडाडून विरोध केला. कुमारी विवाहास विरोध केला.सावित्रीबाई फुले या लेखिका व कवयीत्री सुद्धाहोत्या.सावित्रीबाईंनी १८५४ ला काव्य फुले,व बावनकशी १८९२ ,सुबोध रत्नाकर यांनी प्रकाशित केले.
शिक्षण मिळावा नावाची कविता लिहिली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून आंतरजातीय विवाह व विधींना प्रोत्साहन दिले . या कामी सावित्रीबाईंनी महत्त्वाचे योगदान दिले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रिया आणि बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी शिक्षणालाच एक प्रभावी शस्त्र मानले.त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पुण्यामध्ये इंग्रज सरकारने मेजर कँडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला व शाळेला सरकारी अनुदानही देऊ केले.केंद्र सरकारने १९९८ मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या नावाने टपाल तिकीट सुद्धा जारी केले.
त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा दिवस माता सावित्रीबाईचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.१८९७ मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती व डॉक्टर यशवंत यांनी गावाच्या बाहेर माळरानावर दवाखाना सुरू करून प्लेगच्या साथीने पीडित असलेल्या रुग्णांची सेवा दवाखान्यात सुरू केली होती आणि सावित्रीबाई स्वतः पीडित असलेल्या महिला,बालकांना आपल्या पाठीवर घेऊन उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असत अशाच एका लहान मुलाला पाठीवरून घेऊन जात असताना माता सावित्रीबाई फुले यांनाही प्लेगची लागण झाली व १० मार्च १८९७ रोजी त्या प्लेगच्या साथीमुळेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला.
भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि भारतीय स्त्री वादाची जननी म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांचे कार्य आजही देशाला समाजाला राष्ट्राला विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणादायीआहे.शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज,शिवाजी महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ अशा महापुरुषांचा व मातांचा आदर्श घेऊन देशासाठी व समाजासाठी चांगले काम करावे.आदर्श नागरिक होण्यासाठी महापुरुषांचे, राष्ट्रमातांचे विचार अत्यंत मोलाचे काम करतात.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.गरड पि.डी,श्री.लोंढे एन.आर, श्री.कदम एस.एस श्री. बडे एस.टी,श्री.वाघमारे एस.बी व श्रीमती गुरमे टी.एम या कार्यक्रमा प्रसंगी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्यक्रमाच्या शेवटी श्री.लोंढे एन.आर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.



