केज तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी बांधवांनी वेळा अमावस्या उत्साहात केली साजरी

केज/प्रतिनिधी
भारत वर्षातील मराठी मार्गशीर्ष महिन्यातयेणारी अमावस्या म्हणजेच वेळा अमावस्या केज तालुक्या सह ग्रामीण परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या श्रद्धा,आनंद आणि उत्साहात साजरी केली. अमावस्येला साधारणतः भीतीचे स्थान असले तरी दिवाळी अमावस्या आणि वेळा अमावस्या या आनंद दायी सणांपैकी मानल्या जातात.महाराष्ट्रातील समृद्ध सणपरंपरेतील हा एक वेगळा आणि आगळावेगळा सण असून लातूर,धाराशिव,बीड व सोलापूर जिल्ह्यांच्या कांही भागात विशेषत्वाने साजरा केला जातो.
वेळा अमावस्या हा सण मुळात कर्नाटक राज्यातून सीमावर्ती भागात आला असून आज तो या भागातील शेतकरी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे.या दिवशी काळ्या आईची म्हणजेच धरणीमातेची पूजा करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. धान्य देणाऱ्या,पालन पोषण करणाऱ्या मातृ भूमीचेउपकार स्मरण्याचा हा दिवस मानला जातो.
या दिवशी गावांमध्ये जणू अघोषित संचारबंदीच असते.सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत शेत शिवार गर्दीने फुलून गेलेले दिसतात.प्रत्येक शेतात घरातील सदस्य,पाहुणे, नातेवाईक व मित्रमंडळी एकत्र येतात.या काळात ज्वारीसारखी मुख्य पिके कणसात येण्याच्या अवस्थेत असतात. त्यामुळे ‘लक्ष्मी गर्भवती आहे’ अशी भावना मानून तिच्या डोहाळे जेवणाचा हा सोहळा साजरा केला जातो.
थंडीच्या दिवसांना अनुरूप असा वेळा अमावस्येचा खास मेनू असतो.शेतात उपलब्ध असलेल्या विविध भाज्या एकत्र करून भाजी तयार केली जाते.बाजरीच्या भाकरी,गूळ घालून गव्हाची खीर,तसेच ज्वारीच्या पिठाची रात्रभर ताकात मुरवून केलेली आंबील हे या दिवसाचे प्रमुख पदार्थ असतात.या सर्व पदार्थांचा आधी धरणीमातेच्या पूजेसाठी नैवेद्य दाखवला जातो.
या दिवशी आंबील हा सर्वाधिक आवडीचा पदार्थ असून मोठ्या प्रमाणावर सेवन केला जातो.शेतात कडब्याची खोप बांधून पाच पांडव व इतर देवतांची पूजा केली जाते.पूजेनंतर सर्वजण एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतात.विशेष म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचे शेत नाही, त्यांनाही इतरांच्या शेतात आग्रहाने आमंत्रित केले जाते.संध्याकाळ पर्यंत शेतातच मुक्काम करून, सूर्यास्तानंतर शेतकरी बांधव परतीच्या वाटेला लागतात.एक दिवस पूर्णपणे काळ्या आईच्या सान्निध्यात घालवण्याचा हा सण असून,पुढील वर्षीही वेळा अमावस्या पुन्हा साजरी करण्याची आतुरता प्रत्येकाच्या मनात दिसून येते.
साभार : प्रशांत भोसले



