तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश, सोनीजवळा येथे ३३ के.व्ही.सबस्टेशनसाठी जमिनीची मोजणी पूर्ण

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनीजवळा येथे मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व मागणीला अखेर यश येत असून ३३ के.व्ही.वीज उपकेंद्र (सबस्टेशन) उभारणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. शुक्रवार दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी सोनीजवळा येथे प्रस्तावित ३३ के.व्ही. सबस्टेशनसाठी ग्राम पंचायतीच्या वतीने दोन एकर गायरान जमिनीची अधिकृत मोजणी करण्यात आली.ही जमीन केज तहसीलदारांच्या मार्फत महावितरण कार्यालयाकडे वर्ग करण्यासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.यामुळे सोनीजवळा व परिसरातील गावांना भविष्यात अखंडित वीज पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार, आमदार सौ.नमिताताई मुंदडा,बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. मोजणीच्या वेळी केज तहसीलचे तहसीलदार श्री. राकेश गीड्डे,मंडळ अधिकारी श्री.हजारे, तलाठी वाघमारे मॅडम, कवडे मॅडम तसेच महा वितरणचे अधिकारी उपस्थित होते.गावच्या सरपंच सौ.जान्हवीताई गोविंद ससाणे, उपसरपंच स्वाती दादासाहेब कोकाटे ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच व माजी उप सरपंच,विविध राजकीय व सामाजिक पदाधिकारी, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सबस्टेशनमुळे शेती, उद्योगधंदे व घरगुती वीज पुरवठ्यास मोठा फायदा होणार असून परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.या यशस्वी प्रक्रिये साठी योगदान दिलेल्या सर्व अधिकारी,लोक प्रतिनिधी,ग्रामपंचायत पदाधिकारी,गावकरी, शेतकरी व युवकांचे आभार दादासाहेब ससाणे शिवसेना विधानसभा प्रमुख केज यांनी व्यक्त केले आहेत.



