गुन्हेगारीप्रशासकीय

तहसीलदारांच्या बनावट सही प्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदारविरुद्ध गुन्हा दाखल,महसूल विभागात खळबळ

केज/प्रतिनिधी

केज तहसील प्रशासनाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. तहसीलदारांच्या बनावट सह्या करून अर्धन्यायिक प्रकरणाचा आदेश पारित केल्याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदार आशा वाघ–गायकवाड यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून महसूल विभागात प्रचंड खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अंतर्गत अर्धन्यायिक अधिकार केवळ तहसीलदारांकडे असतात.मात्र संबंधित प्रकरणात तत्कालीन नायब तहसीलदारांनी तहसीलदारांचे अधिकार स्वतःहून वापरून आदेश दिल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.त्या सोबतच आदेशावर तहसीलदारांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून ती ग्राम महसूल कार्यालय तसेच तलाठी कार्यालयास पाठविल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.ही बाब उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने सखोल तपासाचे आदेश दिले.

तपासात आदेशा तील सही बनावट असल्याची पुष्टी झाली असून आदेश पारित करण्याची प्रक्रिया पूर्णतः बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचेही निष्पन्न झाले. या बनावट आदेशामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाली तसेच महसूल अधिकारी व तलाठी यांच्या कामकाजावरही प्रतिकूल परिणाम झाल्याचे समोर आले आहे.सदरील प्रकरणात फसवणूक,सरकारी कागदपत्रांची बनावट निर्मिती,पदाचा गैरवापर अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवली जाण्याची शक्यता असून या प्रकरणामुळे केवळ केज तालुकाच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातही खळबळ उडाली आहे.

अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यामुळे महसूलविभागा तील अधिकाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. स्थानिक पातळीवर या प्रकरणाची जोरदार चर्चा असून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची जनतेतून मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!