अंबाजोगाई तालुक्यातील माकेगावची जागृत एकमुखी दत्तमुर्ती, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान

लेखन सहाय्य
चंद्रकांत पाटील,धनंजय देशमुख
वारकरी सांप्रदायाच्या पाठोपाठ असलेल्या दत्त सांप्रदायात त्रिगुणात्मक स्वरूप असलेल्या दत्तात्रयांच्या मूर्ती आहेत. मात्र,राज्यात जाज्वल्य एकमुखी दत्तमूर्ती मराठवाडयात एकमेव असलेल्या माकेगाव ता. अंबाजोगाई येथील एकमुखी दत्त आहे.या ठिकाणी दत्तजन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो.
राज्यात नाशिक, पंढरपूर येथेच एकमुखी दत्तात्रयाची मंदिरे आहेत, याशिवाय माकेगावयेथील एकमुखी दत्ताचे मंदिर हे तिसरे स्थान.मंदिर परिसर वनश्रीने नटलेला आहे. कोणत्याही निवडणुकी च्या प्रचाराचा शुभारंभ नेते या मंदिरापासून करतात आणि येथून प्रचाराचा प्रारंभ करणारा उमेदवारही विजयी होतो. असा आजवरचा अनुभव असल्याचे भाविक सांगतात.थोर दत्त भक्त संत सर्वज्ञ दासोपंत यांच्या थोरले व धाकटे देवघरा साठी जमिनीची जहागिरी होती.त्यापैकी काही जमीन माकेगाव,कानडी (कोळ) शिवारात होती.
यादोन्ही गावांच्या सीमेवर नांगरत असताना पाषाणमूर्ती वर आली,तेच स्वयंभू एकमुखी दत्त.या स्वयंभूमूर्तीस माकेगाव व कोळकानडी च्या लोकांनी बैलगाडीतून आपल्या गावी नेण्याचा प्रयत्न केला असता,सोळा बैलाची गाडी लावुन मूर्ती सीमेवरून इतरत्र हलविता आली नाही. त्यामुळे आहे,त्याच ठिकाणी पाचुंदा वृक्षाच्या बुंधाशी सुमारे दीडशे वर्षा पूर्वी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
तेव्हापासून येथे दत्तजन्मोत्सव साजरा केला जातो. दत्तजन्मोत्सव मार्गशीर्ष सप्तमी ते पौर्णिमा या कालावधीत नामसंकीर्तन,प्रवचन, गाथाभजन आदी धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात.दत्तात्रयाचे सोळा अवतार समजले जातात. त्यामुळे दरमहा पौर्णिमेस एका अवताराप्रमाणे बारा पौर्णिमा व कार्तिक महिन्यात द्वादशी, त्रयोदशी,प्रतिपदा असे चार अवतार मानून प्रत्येक पौर्णिमेस उत्सव केला जातो. येथील पाषाण मुर्ती अचल असून मंदिराचा गाभारा प्रसन्न आहे.असे असले तरी या मंदिरांचा विकास होणे बाकी आहे.शासनाने तिर्थक्षेत्र विकास निधी उपलब्ध करून माकेगाव तिर्थक्षेत्र विकसीत करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



