राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

केज/प्रतिनिधी
राष्ट्रसंत ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त केज शहरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचीसांगता रविवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. मागील संपूर्ण आठवडा भर शहर व परिसर हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघाला होता.
या सप्ताहात अखंड रामनाम जप,कीर्तन, प्रवचन व भजनसेवेच्या माध्यमातून भक्तिरसाची अनुभूती भाविकांना मिळाली.सप्ताहाच्या प्रारंभी हरिनाम जपाने कार्यक्रमास सुरुवात झाली होती.दररोज सकाळी व सायंकाळी राज्यातील नामवंत कीर्तनकार व प्रवचन कारांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
रविवारी ह.भ.प. शिवकन्याताई चौरे आळंदी देवाची,सोमवारी ह.भ.प.पांडुरंग महाराज मुंडे शेषाबाई मठ संस्थान, तांबवा,मंगळवारी ह.भ.प. नंदिताताई मैंद आईसाहेब मठ संस्थान,महासांगवी, पाटोदा,बुधवारी ह.भ.प. जालिंदर महाराज नेहरकर केज,गुरुवारी ह.भ.प.विष्णु महाराज थोरात कुंबेफळ,शुक्रवारी ह.भ.प.दिपक महाराज मेटे लहुरी तसेच शनिवारी ह.भ.प.ज्ञानदेव बापू महाराज केज यांची भावपूर्ण कीर्तने पार पडली.
सप्ताहाच्या सांगता प्रसंगी रविवारी सकाळी १२ ते ०२ या वेळेत साधू शिवराम पुरी मठ संस्थान,वरपगाव येथील मठाधिपती महंत ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.महाप्रसादासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान ग्रामस्थ,महिला,युवक व भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.भक्ती,श्रद्धा,शांतता व सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन या सप्ताहातून घडले.यायशस्वी आयोजनाबद्दल आयोजक ह.भ.प.ज्ञानदेव बापू नेहरकर यांच्यासह सर्व सहकार्य करणाऱ्या भक्तांनी समाधान व्यक्त केले.



