धारूर नगरपरिषद निवडणूक व 2025 अजय गायसमुद्रे यांना न्यायालयाने उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरवत दिली निवडणूक लढवण्यास परवानगी

धारूर / प्रतिनिधी
धारूर नगरपरिषद सर्वसाधारण निवडणूक 2025 मध्ये वार्ड क्रमांक 10 मधून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करणारे अजय प्रकाश गायसमुद्रे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, किल्लेधारूर यांनी सूचकाची सही नसल्याचे कारण दर्शवत त्यांच्या उमेदवारी अर्जाला 18 नोव्हेंबर 2025 रोजी नकार दिला होता.
या निर्णयाविरोधात नाराज उमेदवार अजय गायसमुद्रे यांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश,केज यांच्या न्यायालयात इलेक्शन अपील क्रमांक 1/2025 दाखल करून निर्णयाला आव्हान दिले होते.विधीज्ञ ए.के.ससाने यांच्या माध्यमातून सादर केलेल्या अपीलात उमेदवारी फेटाळण्याचा निर्णय नियमबाह्य असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकरणाची सविस्तर सुनावणी करण्यात आली.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, संबंधित पुरावे तसेच महाराष्ट्र नगरपंचायत इलेक्शन रुल्स 1966 मधील तरतुदींचा विचार केल्या नंतर माननीय न्यायालयाने अजय गायसमुद्रे यांच्या बाजूने निर्णय देत अपील मंजूर केले.
न्यायालयाने निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार, किल्ले धारूर यांनी दिलेला उमेदवारी अर्ज बाद करण्याचा आदेश रद्द ठरवून अजय प्रकाश गायसमुद्रे यांचा अर्ज कायदेशीर व ग्राह्य ठरविला आहे.त्यामुळे आता ते वार्ड क्रमांक 10 ‘अ’ मधून अधिकृतरित्या निवडणूक लढविणार आहेत.या प्रकरणात विधीज्ञ ए.के.ससाने यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद मांडला,तर त्यांना विधीज्ञ आशिष टोपे यांनी कायदेशीर सहाय्य केले. निर्णयामुळे धारूरमधील निवडणूक वातावरणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.



