
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील विविध घरकुल योजनांतील लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तात्काळ वितरीत करण्यात यावेत,अशी मागणी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सोनी जवळा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण यांनी केली आहे.याबाबत त्यांनी केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नागरगोजे यांना निवेदन सादर केले.
पंतप्रधान आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना आणि मोदी आवास योजना अशा विविध योजनांमधून केज तालुक्यातील गोर-गरीब लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.
शासनाच्या नियमानुसार या घरकुलांच्या निधीचे दोन ते तीन हप्ते संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतात. मात्र अनेक लाभार्थींच्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असून हप्ते वेळेवर न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.हप्ता न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थी वर्षानुवर्षे पंचायत समितीच्या चकरा मारत असून त्यांनामोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.काही लाभार्थ्यांना तर दिवसभर उपाशीपोटी तालुक्याच्या ठिकाणी वाट पाहण्याची वेळ येत असल्याचे मिनाज पठाण यांनी निवेदनात नमूद केले.
शासनाकडून जाणीव पूर्वक विलंब होत असल्याचे आरोप करत, सर्व घरकुल योजनांचे प्रलंबित हप्ते तात्काळ वितरीत न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मिनाज पठाण यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.



