सामाजिक

केज शहरात रिफ्लेक्टर शिवाय धावणाऱ्या उसाच्या गाड्यांनी वाढवला अपघातांचा धोका; केजकरांची सुरक्षा धोक्यात

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील गंगा माऊलीशुगर उमरी आणि येडेश्वरी साखर कारखाना आनंदगाव या दोन साखर कारखान्यांचा ऊस वाहतूक करणारी वाहने सध्या केज शहरातून मोठ्या प्रमाणावर धावू लागली आहेत.या वाहनांवर आवश्यक रिफ्लेक्टर व मागील प्रकाशयंत्र (लाईट) नसल्‍याने रात्रीच्या वेळी या वाहनांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे,केज शहरातून दोन राज्य महामार्ग जात असल्याने दिवसरात्र वाहनांची मोठी वर्दळ असते.अशा परिस्थितीत साखर कारखान्यांच्या ट्रॅक्टर – ट्रॉली आणि ट्रक यांच्या बेपर्वा वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.मागील वर्षी अशाच उसाच्या वाहनांच्या धडकेत अनेक अपघात झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत. काही ठिकाणी तर गंभीर जखमी आणि मृत्यूंच्याही घटना नोंदल्या गेल्या आहेत. मात्र,त्यानंतरही संबंधित साखर कारखान्यांनी आणि वाहतूकदारांनी यासंदर्भात कोणतीही ठोस खबरदारी घेतलेली नाही,अशी नागरिकांची तक्रार आहे.

अनेक नागरिकांनी सांगितले की,रात्रीच्या वेळी ऊस घेऊनजाणाऱ्या ट्रॉलींना रेफ्लेक्टर दिसत नाहीत,काही वाहनांच्या मागील दिवे बंद असतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांना ती वाहने नजरेस पडत नाहीत आणि अपघात घडण्याची शक्यता वाढते.तसेच ट्रॅक्टर चालकांनी लावलेल्या मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याबाबत ही कारवाई होणे गरजेचे आहे.

या बाबत नागरिकांनी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाकडे आणि वाहतूक विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर रिफ्लेक्टर, मागील दिवे आणि ओव्हर लोड नियंत्रण यांची सक्ती करावी,तसेच गाणीमोठ्या आवाजात लावण्यावर पायबंद घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.केज तालुक्यातील या परिस्थितीकडे संबंधित विभागांनी लक्ष देऊन नागरिकांचा जीव धोक्यात न आणता सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!