
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थी – दिवस अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रविष्ठ (प्रवेश) दिवस व्याख्यान कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.
त्यानंतर व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आनंद भैय्या गायकवाड व दादासाहेब गायकवाड यांची व्याख्याने झाली.विद्यार्थी – दिवस हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रविष्ट (प्रवेश) दिवस समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन व्याख्यान देताना आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.
वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेणारे डॉ. बाबासाहेब देशाचे संविधान लिहितात आणि त्याच संविधानावर देश चालतो हि प्रेरणादायी घटना असल्याचे प्रतिपादन आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.दादासाहेब गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानात शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रामराजे गायकवाड हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.
सुत्रसंचालन एस.के.वैरागे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला वाचक, हितचिंतक,जेष्ठ नागरीक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.



