औरंगपुर येथील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावन धाम येथे भक्तीचा सोहळा संपन्न २५,००० दिव्यांनी झळाळले आकाश!

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील औरंगपुर येथील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावन धाम येथे यंदाही २५,००० दिव्यांचा दिमाखदार दीपोत्सव अत्यंत भक्ती भावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या प्रेरणेतून करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक स्वरूपात साजरा होणारा हा दीपोत्सव आज महाराष्ट्र भरात प्रसिद्ध झाला आहे. दीपोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकां सह दूरवरच्या गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांनी दिव्यांच्या प्रकाशात संत तुकोबाराय यांच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली.
या दिव्य सोहळ्याला राजकीय,सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून तेज आणले. विशेष म्हणजे अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशरावजी आडसकर साहेब यांची उपस्थिती सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न केले. दीपोत्सवाच्या निमित्ताने आयोजित संगीत रजनी कार्यक्रमात ह.भ.प.गणेश महाराज भगत यांच्या सुमधुर वाणीने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
या दिव्य दीपोत्सवाने संत तुकोबारायांच्या नामस्मरणाचा जयघोष आकाशात दुमदुमला आणि श्रद्धा,भक्ती व संस्कृतीचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला.



