केज येथील भगवान श्रीकृष्णआश्रम येथे आनंदी दीपावली महोत्सवात दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, प्रेरणादायी प्रबोधन व आध्यात्मिक प्रवचनाने उत्साहात साजरा झाला दीपावली उत्सव

केज/प्रतिनिधी

केज शहरात सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचा संगम घडविणारा आनंदी दीपावली महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम भगवान श्रीकृष्ण आश्रम,केज यांच्या वतीने भागवत भूषण ह.भ.प.श्री.केशव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून शुक्रवार,दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.याउपक्रमाचा उद्देश दिव्यांग बांधवांना दीपावली सणानिमित्त आनंदाचा वाटा देणे हा होता.कार्यक्रमाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तीं ना जीवनावश्यक वस्तूंचे संच तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. समाजातील वंचित घटकां प्रती आपुलकीचा हा भावनिक व सेवाभावी उपक्रम ठरला.यावेळी भागवत भुषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांचे प्रवचन झाले.
आध्यात्मिक प्रवचनाने प्रसन्न वातावरण
यानंतर महान तपस्वी, परम त्यागी स्वामी भारतानंद गिरी महाराज यांनी केलेल्या प्रवचनाने सभागृहात आध्यात्मिक प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले.त्यांच्या ओजस्वी वाणीने उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाले. यावेळी आशिर्वाद देताना त्यांनी सांगितले की,गोर गरीब जनता व दिव्यांग यांना आपल्या घासातला घास दिला पाहिजे.मनो रुग्णांना देखील स्वच्छ करुन गोडधोड पदार्थ खायला द्यावेत.श्रीकृष्ण महाराज सारुक हे गेल्या तेरा वर्षांपासून हा उपक्रम घेत असुन मी दरवर्षी येत आहे.
सेवाभावी उपक्रमाने उजळली दीपावली
दुपारी २ वाजता अपंग व्यक्तींना जीवनावश्यक साहित्य संचाचे वाटप करण्यात आले.त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेह भोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन भागवत भुषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री व भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले. समाजा तील विविध स्तरांतील मान्यवर, नागरिक,भाविक तसेच लाभार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवाभावी उपक्रमाला यशस्वी केले.
हा उपक्रम केवळ दीपावली सणापुरता मर्यादित न राहता समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला असून, आयोजकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



