गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीला गाडीत बसवून गैरवर्तन; लक्ष्मण बेडसकर विरुद्ध गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी

केज शहरात अल्पवयीन मुलीला गाडीत बसवून तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लक्ष्मण बेडसकर याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी तिच्या भावाचा वाढदिवस असल्याने ती आई व भावासह मानलेली मावशी माया मेघवाल यांच्या घरी गेली होती. रात्री ८.३० वाजता पीडित मुलगी तिची मावशी माया व तिची ६ वर्षांची मुलगी असे तिघे केक आणण्यासाठी चाटे हॉस्पीटल समोर आले.

यावेळी ओळखीचे लक्ष्मण बेडसकर हा त्याची स्विफ्ट कार घेऊन आला. त्याने “चहापाणी नाष्टा करूया” असे सांगून पीडित मुलगी, तिची मावशी माया व तिची ६ वर्षांची मुलगी  गाडीत बसवले. त्यानंतर त्याने कार धारूर चौकातून चिंचपूरमार्गे कोल्हेवस्ती रस्त्यावर नेली. तेथे गाडी थांबवून पीडित मुलीच्या हाताला धरून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना हात लावून ओढण्याचा प्रयत्नही केला. यावेळी पीडित मुलगी , तिची मावशी व लहान मुलगी यांनी आरडाओरड केली असता, “ओरडल्यास मारून टाकीन” अशी धमकी देण्यात आली.

घटनास्थळी योगायोगाने आणखी एक कार आली. त्यातील उजेडात संधी साधून बेडसकर गाडीमधून पळून गेला. ही कार पीडित मुलीची आई व उसतोड मुकादम बाळू साठे यांची होती. बाळू साठे यांनी पीडित मुलीला  गाडीत जाताना पाहिल्याने मुलीच्या आईला  फोन करून माहिती दिली होती. त्यामुळे तेथे वेळेवर पोहोचून हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३मधील कलम ७४, ७५(१), ७५(२), ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ८ व १२ अंतर्गत लक्ष्मण बेडसकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास प्रकाश शेळके हे अधिकारी करीत आहेत. या घटनेमुळे केज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!