जागेची किंमत कमी करून देतो केज सह दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा नवा खेळ सुरु ! दस्त नोंदणीसाठी घेतले जातात हजारो रुपये, नागरिकांचा संताप

केज/प्रतिनिधी
केज शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.दस्त नोंदणीसाठी गोरगरीब जनतेकडून हजारो रुपयांची लाच मागवली जाते,अशी गंभीर तक्रार नागरिकांनी केली असून, या लुबाडणाऱ्या दलाल व संबंधित कर्मचाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करावी,अशी मागणी पक्षकारांकडून होत आहे.
शासनाच्या नियमानुसार, शेतजमीन,घर किंवा जागा खरेदी-विक्रीसाठी सरकारने निश्चित केलेल्या मुल्यांकनावर आधारित फी भरून दस्त नोंदणीची प्रक्रिया केली जाते.मात्र, प्रत्यक्षात शासनाचे शुल्क भरूनही दस्त नोंदणी साठी अतिरिक्त रकमेची मागणी दलालांच्या माध्यमातून केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.अलीकडेच दलालांनी नवीन फसवणुकीची पद्धत सुरू केली आहे.
जागेची किंमत कमी करून देतो,तुमची जागा बागायती सर्वे नं मध्ये दाखवत आहे किंमत जास्त होईल त्यामुळे तुम्हाला जास्त चलन भरावे लागेल,पण आम्ही ते कमी करून देतो ;मात्र त्यासाठी वरून वेगळी रक्कम द्यावी लागेल, आणि ऑपरेटरचे वेगळे पैसे द्यावे लागतील अशी बनावट आश्वासने देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.
अशा पद्धतीने दस्त नोंदणी प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे जाळे अधिक घट्ट झाले आहे.काही दलाल आणि संबंधित कर्मचारी दस्त नोंदणीपूर्वीच व्यवहार ठरवतात आणि व्यवहार पूर्ण झाल्यावर कमिशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे घेतात.ही अवैध पद्धत उघडपणे सुरु असून, गोरगरीब जनतेचे आर्थिक शोषण होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “ना खाऊंगा,ना खाने दूंगा” अशी घोषणा केली असली तरी या कार्यालया तील दलाल व काही कर्मचारी या घोषणेची थट्टा करत असल्याचे नागरिक सांगत आहेत. “आमचं कोणी काही करू शकत नाही” याभावनेत हे लोक वावरत असून, भ्रष्टाचाराचा उघड उघड काळाबाजार सुरू आहे.
नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या दलाल आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करून आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात यावी.तसेच, सह दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्टाचारावर अंकुश घालून सर्वसामान्यांना न्याय मिळावा,अशी तीव्र मागणी जनतेकडून होत आहे.



