जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व.केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
भौतिक सुविधांपेक्षाही शिक्षकाकडे असणारी निष्ठा जास्त महत्त्वाची असते- कौतिकराव ठाले पाटील कांतराव गाजरे, शिवाजीराव समुद्रे, प्रसाद कुलकर्णी,प्रवीण देशमुख,दत्ता सत्वधर, गणेश भालेकर हे ठरले आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ या नावातूनच संस्थेच्या संस्थापकांची ध्येय उद्दिष्टे स्पष्ट होतात व्यक्ती जीवन,समाज जीवन व राष्ट्रजीवन सुधारण्यासाठी उत्कृष्ट विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून घडवले जातात.एखाद्या शिक्षकाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्याच्या नावे आदर्श शिक्षक पुरस्कार देणारी तसेच विविध ध्येय उद्दिष्टे समोर ठेवून चालणारी ही नाव लौकिक शाळा आहे. भौतिक सुविधांपेक्षाही शिक्षकाकडे असणारी निष्ठा जास्त महत्त्वाची असते आणि असेच निष्ठावान,कार्य प्रामाणिक शिक्षक या शाळेशी,जोडले गेले आहेत.येथील शिक्षका मुळेच या शाळेचे वेगळेपण अबाधित असल्याचे दिसून येते. असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य श्री.कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेमध्ये दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत हर्षोत्सात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष,जीवन विकास शिक्षण मंडळ केज हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उपस्थिती दर्शविली. इतर उपस्थित मान्यवरां मध्ये दादासाहेब गोरे सचिव,म.सा.परिषद छत्रपती संभाजीनगर, दगडू दादा लोमटे कार्यकारीणी संचालक, म.सा.परिषद छत्रपती संभाजीनगर,कुंडलिकराव आतकरे माजी कोषाध्यक्ष,म.सा. परिषद,जी.बी.गदळे सचिव,जीवन विकास शिक्षण मंडळ केज, गणेश कोकीळ सहसचिव जीवन विकास शिक्षण मंडळ केज,माजी उपाध्यक्ष डॉ.पांडुरंग तांदळे,डॉ. प्रतापराव नाळवंडीकर सेवानिवृत्त प्राध्यापक कृषी महाविद्यालय अंबाजोगाई,दिनकरराव नाळवंडीकर सेवानिवृत्त अभियंता पाटबंधारे विभाग केज,शैलाताई इंगळे अध्यक्षा,शालेय व्यवस्थापन समिती, शाळेच्यामुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,प्राचार्य शंकर भैरट,प्रा.वि.मु.अ. वसंत शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रबोधकांत समुद्रे तसेच श्रेया, प्रांजल, संस्कृती, किशोरी, सिद्धी,सुसंस्कृती, तेजस्विनी,सिद्धांत व जगदीश या विद्यार्थ्यांनी ‘शब्द सुमने अंतःकरणे, आतिथींना वंदुनी’ या गीताने केले .प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी शिक्षण क्षेत्रातील कर्तुत्वान शिक्षकांना स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये कांतराव गाजरे सेवानिवृत्त मु.अ. माजलगाव , शिवाजीराव समुद्रे सेवानिवृत्त शिक्षक धारूर,प्रसाद कुलकर्णी वसुंधरा मा. व उच्च मा.विद्यालय पैठण,प्रवीण देशमुख मु.अ. जयभवानी कन्या प्रशाला केज,दत्ता सत्वधर स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विभाग केज, गणेश भालेकर स्वामी विवेकानंद विद्या मंदिर स्वयं अर्थ सहाय्यीत केज इत्यादी तसेच याप्रसंगी शाळेतील सहशिक्षिका गौरी जगताप यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील ‘बेस्ट क्लास टीचर अवार्ड’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय जी.बी.गदळे यांनी करुन दिला ते म्हणाले की,शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा आलेख नेहमी उंचावत राहावा यास्तव त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्था दरवर्षी करत असते,’मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ या उक्ती प्रमाणे ज्यांनी जीवन व्यथित केले असे नाळवंडीकर गुरुजी, गुरुजींनी शहरातील जवळपास शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्याचा ठसा उमटून राहावा म्हणून त्यांच्या नावे हापुरस्कार दिला जातो.याप्रसंगी शैलाताई इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जेशिक्षक उपक्रमशील व कार्य प्रामाणिक असतात अशा शिक्षकांचाही गुणगौरव झाला पाहिजे तेंव्हा यावर्षी हा पुरस्कार शाळेतील सहशिक्षिका गौरी जगताप यांना मिळाल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी बोलताना दगडू लोमटे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हेच शिक्षकांच्या कार्याचा पुरावा असतो.तेव्हा शिक्षकांनी निष्ठेनेआपले कर्तव्य तत्परतेने पार पाडले पाहिजे.याप्रसंगी शाळेच्या शिस्तीचेही त्यांनी कौतुक केले.
दादासाहेब गोरे याप्रसंगी बोलताना म्हणाले की,कोणत्याही शिक्षकाचे मोठेपण हे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशात असते,शिक्षक हा निस्वार्थी असतो, छडी हातात न घेता आदर्श शिक्षक होणे ही एक कसोटीचअसल्याचे त्यांनी व्यक्त केले.जे शिक्षक उत्तम अध्यापन करतात तेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवतात.
याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना प्रविण देशमुख म्हणाले की,जी.बी.गदळे सर यांच्याकडे पाहून आम्ही शिकलो व यातूनच मी शिक्षक झालो,ते माझे प्रेरणास्थान आहेत. कांतराव गाजरे म्हणाले, धन्य आम्ही जन्मा आलो,दास विठोबाचे झालो’ या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे मी ही धन्य झाल्याची प्रचिती मला आली.साने गुरुजींना मी कधीच प्रत्यक्ष पाहिले नाही परंतु जेव्हा मी या ऋषीतुल्य नाळवंडीकर गुरुजींच्या नावे पुरस्कार घेत होते तेव्हा त्या फोटोकडे पाहिल्यावर मला साने गुरुजींनाच पाहिल्यासारखे वाटले.
निष्ठा ,वृत्तस्थ भावना, विद्या व्यासंगीपणा हे तीनगुण जर शिक्षकांनी जपले तर गुरुजींची आठवण जपल्यासारखे होईल.जगजेत्ता सिकंदर,अब्राहम लिंकन,कोलंबस आणि छत्रपती शिवाजीराजे यांचा आदर्शविद्यार्थ्यांनी घ्यावा.या प्रसंगी बोलताना दत्ता सत्वधर म्हणाले की,कुटुंबातील शिक्षक असणारे चुलते यांचा आदर्श घेऊनच मी शिक्षकी हा पेशा स्वीकारला.भारतीय महसूल सेवेमध्ये नियुक्त असलेल्या एका माजी विद्यार्थ्यांने माझी भेट घेतली.त्याचवेळी खऱ्या अर्थाने मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यासारखे वाटले.
याप्रसंगी इतरही काही आठवणींना त्यांनी उजाळा देण्याचा प्रयत्न केला.अध्यक्षीय समारोपात अंकुशराव इंगळे म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेत आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी विश्वंभर कोकीळ व केशवराव नाळवंडीकर गुरुजी यांनी ही शाळा सुरू केली.त्यांची काम करण्याची प्रचंड चिकाटी होती.त्यांनीच खऱ्या अर्थाने विद्यार्थी व शिक्षक या उभयतांनाही जिद्दीने काम करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांनी मानले.



