रेणुकागडावर पारंपरिक विधींनी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ, जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते घटस्थापना

श्रीक्षेत्र माहूर/प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र महोत्सवाची सुरुवात दि.२२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने झाली. सकाळी ११ वाजता संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश श्री. सुनील वेदपाठक यांच्या हस्ते घटस्थापना पार पडली.यावेळी सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला,कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती.
याप्रसंगी श्री. रेणुकामातेच्या मूर्तीला पारंपरिक अलंकार चढवून महाआरती करण्यात आली. पूजाविधीचे पौरोहित्य वे.शा.सं.रवी काण्णव, अरविंद देव,अनिल काण्णव,भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले. घटस्थापनेच्या मंगल पर्वानिमित्त स्त्रीशक्ती पूजेचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले.त्यानुसार अध्यक्ष श्री.सुनील वेदपाठक, सचिव दोन्तुला व कोषाध्यक्ष जगताप यांनी सपत्नीक कुमारीका व सुवासिनी पूजन केले.यावेळी हजारो भाविक भक्त उपस्थित होते.
याप्रसंगी छबीना काढून परिसर देवता पूजन झाले.त्यानंतर मातेला नैवेद्य अर्पण करून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला.भाविकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,ना.पंकजाताई मुंडे,आमदार भीमराव केराम व आमदार संजय बांगर यांनी श्री रेणुकामातेच्या दर्शनाचा लाभ घेतला.



