जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांसह शेतीचे नुकसान,तातडीने पंचनामे करा
खा.बजरंग सोनवणे यांचे चौफेर लक्ष, पंचनाम्यासाठी जिल्हाधिकारी यांना दिले तातडीने पत्र

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात दि.१५ ऑगस्ट रोजी पहाटे जिल्ह्यातील जवळपास १७ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून याठिकाणी पिकांसह शेतीचेही नुकसान झालेले आहे.अनेक ठिकाणी शेती खरडून गेलेली असून जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत,असे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
मागील चार दिवसां पासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत असून दि.१५ ऑगस्ट रोजी पहाटे पावसाने जिल्ह्यात हाहाकार केला आहे.जिल्ह्यातील बीडतालुक्यातील पाली, नाळवंडी,चौसाळा, नेकनूर,लिंबागणेश, पाटोदा तालुक्यात पाटोदा,थेरला,गेवराई तालुक्यात धोंडराई, रेवकी, तलवाडा, केज तालुक्यात युसूफवडगाव , बनसारोळा, नांदूरघाट, परळी तालुक्यात नागापूर,सिरसाळा, शिरूर तालुक्यातील तिंतरवणी,ब्रम्हनाथ येळंब या महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.याच बरोबर दि.१६ ऑगस्ट च्या रात्रीही पावसाने हजेरी लावली असून इतर अनेक ठिकाणी सुद्धा पिके पाण्यात आहेत.
तर काही ठिकाणी नदीचे पात्र ओलांडून पाणी शेतात शिरले आहेत.केज तालुक्यातील मांजरा नदी दुथडी भरून पाहत असून राजेगाव, दैठणा,बोरगाव,भोपला, हदगाव,डोका व लाखा या सात गावासह संपूर्ण मांजरा पट्ट्यातील गावे क्षतीग्रस्त झालेली आहेत.
शेतीच्या नुकसानी सोबतच घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.नदीपात्र ओलांडून पाणी पिकात व गावांत शिरले आहे. यामुळे पिकांचे,शेतीचे आणि रहिवाशीघरांचेही नुकसान झालेले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच भागात जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे,शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असून नुकसानग्रस्त भागात तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करुन शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावेत,असेही खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे.



