आईचे स्वप्न साकार करण्यासाठी ७० लाखांची मदत,बिभीषण गायकवाड यांनी स्वखर्चाने सुकळी येथे उभारली जिल्हा परिषद शाळा

केज/प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी आणि मातृप्रेमाचा एक अनोखा आणि प्रेरणा दायी आदर्श बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाहायला मिळाला आहे.सुकळी येथील रहिवासी आणि पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिभीषणराव गायकवाड यांनी आपल्या दिवंगत आईचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल ७० लाख रुपये स्वतः खर्च करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पाच सुसज्ज आरसीसी वर्गखोल्या उभारल्या आहेत.या नूतन आणि आधुनिक शाळा इमारतीचा दिमाखदार लोकार्पण सोहळा बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जतीन रहमान यांच्या हस्ते बुधवारी,दि.१७ जून रोजी अत्यंत उत्साहात पार पडला.एकेकाळी मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमुळे शिक्षणा पासून वंचित राहण्याची भीती सोसणाऱ्या शेतकरी,शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी गायकवाड यांचे हे दातृत्व एक मोठे वरदान ठरले असून,आता गावातील चिमुरड्यांना दर्जेदार वातावरणात ज्ञानार्जन करता येणार आहे.एकेकाळी या जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती,ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते.
ही वेदना ओळखून बिभीषणराव गायकवाड यांनी संपूर्ण खर्च उचलत केवळ शाळाच बांधली नाही,तर त्यात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे.या डिजिटल शाळेत पाच वर्ग खोल्यांसह संगणक,प्रोजेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे,देखणे बोलके चित्र,सुसज्ज स्वच्छतागृह,स्वयंपाक गृह,हॉल,आकर्षक प्रवेशद्वार आणि खेळणी साहित्य उपलब्ध करून दिले आहे.यासोहळ्याला प्रशिक्षणार्थी शिक्षण अधिकारी मुळे,गट शिक्षणाधिकारी सुनील केंद्रे,उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी आबासाहेब घायाळ आणि जनकल्याण बँकेचे अध्यक्ष उमेशराव कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर,ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विनायक आवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला,तर उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड व गावातील युवकांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी तोंडभरून कौतुक केले. समाजात अशा प्रकारे दानशूर व्यक्ती पुढे आल्यास शासकीय शाळांची स्थिती निश्चित बदलेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर दुसरीकडे,आईचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त करताना बिभीषणराव गायकवाड भावुक झाले.आपल्या गावातील कष्टकऱ्यांच्या लेकरांना शहरासारख्या उत्तम सुविधा मिळाव्यात आणि समाजाचे ऋण फेडता यावे,याच भावने तून ही शाळाउभारल्याचे त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितले.गायकवाड यांच्या या ऐतिहासिक आणि संवेदनशील पावलामुळे सुकळी गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाने घेतले जात आहे.



