गुन्हेगारीसामाजिक

अंबाजोगाईत शिकवणी परिसरात गुंडगिरीचा कळस, बारावीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला,प्रकृती चिंताजनक

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील शिकवणी परिसरात रात्री अभ्यासिका संपवून खोलीवर परतणाऱ्या आशिष विनोद माने या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी भर रस्त्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्लाकेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेमुळे शिकवणी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणी वर आला असून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष माने वय १७,रा. रेपेवाडी,सध्या रा. माळीनगर,अंबाजोगाई हा १२ वीविज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे.तो अंबाजोगाईत भाड्याने खोली करुन राहतो. बुधवार दि.१७ जुन रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तो परिसरातील एका अभ्यासिकेतून अभ्यास करून खोलीवर पायी जात असताना हा प्रकार घडला.यावेळी दुचाकीवर आलेल्या साहिल मांदळे,जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीने त्याला विनाकारण शिवीगाळ करत अडवले. गाडीवरून उतरलेल्या एका आरोपीने जीवे मारण्याच्या उद्देशाने आशिषच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला.या अनपेक्षित हल्ल्यामुळे आशिष रस्त्यावर कोसळला.

घटना घडल्या नंतर हल्लेखोर दुचाकी वरून पसार झाले. यावेळी जखमी झालेल्या आशिषने मदतीसाठी धावून आलेल्या व्यक्ती ला फोनचा पासवर्ड दिला आणि बेशुद्ध झाला.त्या व्यक्तीने आशिषच्या आईला कॉल करून त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या आशिषवर लातूर येथील रुग्णालयात उपचार चालू असून डोक्याला मार लागला आहे.दरम्यान या घटने नंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!