
केज/प्रतिनिधी
केज विधानसभा मतदार संघातील एका ग्रामीण भागातील सुकन्येने आपल्या अद्भूत कौशल्याच्या जोरावर क्रीडा जगतात भारताचा डंका वाजवला आहे. केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील सुकन्या कु.हिंदवी परमेश्वर चौरे हिने वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिप मध्ये तब्बल दोन सुवर्णपदकांना (Gold Medals) गवसणी घालत जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे.तिच्या या सुवर्णभरारीमुळे संपूर्ण देशवासियांचे लक्ष केज मतदारसंघाकडे वेधले गेले आहे.
गुजरात मधील अहमदाबाद येथे या जागतिक योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि कडक स्पर्धेत हिंदवीने आपल्या उत्कृष्ट व अचूक कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत दुहेरी सुवर्णपदक पटकावले. जागतिक व्यासपीठावर सुवर्णपदक स्वीकारताना हिंदवीने भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला, तो क्षण संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आणि विशेषतः बीड जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला.
केजच्या मातीतून जागतिक व्यासपीठा पर्यंतचा प्रवास हिंदवीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि कठोर परिश्रम घेत योगासनामध्ये हे नैपुण्य मिळवले आहे.केजच्या मातीतून घडलेल्या या प्रतिभावान खेळाडूने थेट जागतिक पातळीवर आपल्या नावाचा आणि मतदारसंघाचा दबदबा निर्माण केला आहे. तिच्या या यशाने ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी आणि मेहनत मिळाल्यास ते आकाश कशाप्रकारे कवेत घेऊ शकतात,हे दाखवून दिले आहे.
आमदार नमिता मुंदडा यांच्याकडून कौतुक आणि अभिनंदन
हिंदवीच्या या देदिप्यमान यशाबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाई नगर पालिकेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा,केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी तिचे विशेष कौतुक करत मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
हिंदवीने मिळवलेले हे यश केज मतदार संघासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. केजच्या मातीतील एका मुलीने जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा फडकवला,ही आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे.हिंदवीची ही यशोगाथा केज मतदार संघातील आणि देशातील असंख्य युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल. तिला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
—आ.नमिता मुंदडा
हिंदवी चौरे हिच्या या ऐतिहासिक कामगिरी मुळे सध्या जिवाचीवाडी व संपूर्ण केज तालुक्यात आनंदाचे वातावरण असून,तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



