
केज/प्रतिनिधी
पेरणीचे दिवस तोंडावर आले असताना शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी केज तालुका कृषी कार्यालयाने मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू केले आहे.कृषी कार्यालयाचा अत्यंत ढिसाळ आणि अनगोंदी कारभार आता थेट चव्हाट्यावर आला आहे. केजचे तहसीलदार श्री. शुभम पवार,ए पी आय सिरसागर साहेब,मंडळ अधिकारी भालेराव आणि ढाकणे यांनी अचानक कृषी कार्यालयाला भेट देऊन पंचनामा केला असता, कार्यालयातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कार्यालयात एकही कर्मचारी वेळेत हजर नव्हता,तर मुख्य तालुका कृषीअधिकारी श्री.सागर पठाडे हे कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत रजा न घेता गायब असल्याचे पंचनाम्यात उघड झाले आहे.
साहेब रजेवर,पण पदभार कोणाकडेच नाही!
कृषीअधिकारी श्री.सागर पठाडे हे कार्यालयात गैरहजर तर आहेतच, पण त्यांनी आपल्या रजेचा कोणताही अधिकृत अर्ज दिला नव्हता.विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार इतर कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याकडे सोपवला नाही.त्यामुळे या मंडळीचा हा सगळा कारभार सध्या पूर्णपणे ‘बोगस’ आणि रामभरोसे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.पंचनामा पूर्ण होईपर्यंत एकही मोठा अधिकारी कार्यालयाकडे फिरकला नाही.
टोकन मिळूनही शेतकरी दोन- दोन दिवस रांगेत; कृषी दुकानांवर काळा बाजार
सध्या केज तालुक्यात सोयाबीन बियाणे आणि खतांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना अनुदानित सोयाबीनचे टोकन तर मिळाले आहे,परंतु प्रत्यक्षात बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस कृषी दुकानांच्या दारात ताटकळत उभे राहावे लागत आहे.
माहितीचा अभाव
खते,बी-बियाणे आणि अनुदानित सोयाबीन वाटपाविषयी कार्यालया तील कोणत्याही कर्मचाऱ्याला कसलीही माहिती नाही.
चढ्या दराने विक्री
शासकीय यंत्रणेच्या या ढिसाळपणामुळे अधिकृत बियाणे उपलब्ध होत नसल्याचा फायदा खासगी कृषी दुकानदार घेत असून,बियाण्यांची चढ्या भावाने बेकायदेशीर विक्री सुरू आहे.
सत्ताधाऱ्यांवरही आली कार्यालयाच्या दारात बसण्याची वेळ!
कृषी कार्यालयाच्या या मुजोर कारभारामुळे केवळ सामान्य शेतकरी च नाही,तर सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी,उप सभापती आणि तालुका अध्यक्ष यांच्यावरही कृषी कार्यालयाच्या दारात ताटकळत बसण्याची दुर्दैवी वेळ आली.
केज तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची स्थिती सध्या अशीच दयनीय झालीअसल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती डॉ.वासुदेव नेहरकर ,ता.अध्यक्ष भगवान केदार,विकास जाधव,दत्तकुमारकाकडे, पञकार प्रकाश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक कृषी विभागाच्या या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आणि संताप निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या नेतृत्वा खाली आक्रमक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी दिला आहे.
तहसीलदारांनी केलेल्या या थेट कारवाईमुळे कृषी वर्तुळात एकच खळबळ उडाली असून,आता कर्तव्यात कसूर करणाऱ्या या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते,याकडे संपूर्ण केज तालुक्याचे लक्ष लागले आहे.



