
केज/प्रतिनिधी
मृग नक्षत्र सुरू होताच केज तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची लगबग सुरू झाली आहे. मात्र,ऑनलाइन नोंदणी करूनही सोयाबीन बियाणे मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि खतांची होणारी जादा दराने विक्री या पार्श्वभूमी वर शिवसेना पक्षाच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. ऑनलाइन नोंदणी केलेल्या सर्वशेतकऱ्यांना तात्काळ सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे,तसेच ज्यांची नावे यादीत आली नाहीत त्यांच्यासाठी पर्यायी उपाययोजना करावी अशी आक्रमक मागणी शिवसेना तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.तालुक्यातील खत आणि बियाणे टंचाई तसेच दुकानदारांकडून होणाऱ्या अडवणुकीच्या विरोधात शिवसेना तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील,तालुका सचिव विकास काशीद,उप तालुकाप्रमुख महेंद्र चाटे आणि युवासेना तालुका प्रमुख दत्ता काकडे यांनी कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
तात्काळ बियाणाचा पुरवठा करावा
महाडीबीटी किंवा ऑनलाइन पोर्टलवर सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब बियाणे उपलब्ध करून द्यावे.
वंचित शेतकऱ्यांना दिलासा
ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करूनही तांत्रिक अडचणींमुळे किंवा त्रुटींमुळे त्यांची नावे लॉटरीत अथवा यादीत आलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ विशेष उपाययोजना कराव्यात.
नफेखोरीला चाप लावा
कृषी दुकानदारांकडून खते आणि बियाण्यांची शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा (MRP) जास्त दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.अशा नफेखोर दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी.
कच्च्या पावत्या बंद करा
अनेक दुकानदार शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदी केल्यानंतर कच्ची पावती (एस्टिमेट) देऊन फसवणूक करतात.शेतकऱ्यांना केवळ आणि केवळ अधिकृत व ओरिजनल पावतीच देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात बियाणे बोगसनिघाल्यास शेतकऱ्यांना क्लेम करता येईल.
शेतकरी आधीच संकटात आहे.त्यात ऐन पेरणीच्या तोंडावर कृषी विभागाच्या नियोजना अभावी बियाण्यांसाठी त्याला वणवण फिरावे लागत असेल तर हे सहन केले जाणार नाही.तसेच, कोणत्याही दुकानदाराने खते-बियाणे चढ्या दराने विकल्यास किंवा कच्ची पावती दिल्यासशिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशारा पृथ्वीराज पाटील तालुका प्रमुख,शिवसेना यांनी दिला आहे. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत,केज तालुक्यात बियाणे व खतांचा तुटवडा भासू दिला जाणार नाही आणि नियमबाह्य काम करणाऱ्या दुकानदारांवर भरारी पथकांद्वारे कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.



