कृषीसामाजिक

बोरीसावरगाव येथे विज्ञान आधारित कृषी निविष्ठा व्यवस्थापन जनजागरण अभियान संपन्न

केज/प्रतिनिधी

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या वतीने केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथे “विज्ञान आधारित कृषी निविष्ठा व्यवस्थापन विषयक समग्र जन जागरण अभियान” अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच वैजनाथ देशमुख होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाबीज अंबाजोगाईचे प्रक्षेत्र अधिकारी सचिन सोनवणे,कृषि विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ.प्रदीप सांगळे,कृषि अभियंता प्रमोद रेणापूरकर तसेच सहाय्यक कृषिअधिकारी श्रीमती डांगे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कृषि अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीमधील बियाणे,खते व औषधे यांसारख्या कृषी निविष्ठांचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ट्रॅक्टरचा सुयोग्य वापर, सुधारित बैलचलित अवजारांचा वापर तसेच कार्यक्षम ऊर्जा वापर याविषयी जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की,खरीप हंगामामध्ये बियाणे,खते व तण नाशकां मध्ये बचत करून शाश्वत उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा-सरी टोकण यंत्राचा वापर, बैलचलित सौर आधारित फवारणी यंत्र,ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र तसेच ड्रोनद्वारे फवारणी यांसारख्या आधुनिक यांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

महाबीजचे प्रक्षेत्र अधिकारी सचिन सोनवणे यांनी महाबीज च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या बीजोत्पादन कार्यक्रमाची माहिती देताना शेतकऱ्यांना बीजोत्पादनाद्वारे शेतीतील उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले.प्रत्येक गावामध्ये किमान २५ एकर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी महाबीज कडून सहकार्य करण्यात येत असून त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप सांगळे यांनी जैविक खते व जैविक औषधांच्या वापराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आगामी खरीप हंगामा साठी बीजप्रक्रियेस उपयुक्त विविध निविष्ठा कृषि विज्ञान केंद्रावर उपलब्ध असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती डांगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी यायोजनांचा लाभ घ्यावा,असे सांगितले.कार्यक्रमास गावातील युवक, प्रगतीशील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!