गप्पेवाडीतील धोकादायक वीज तारांकडे महावितरणचे दुर्लक्ष;अपघाताची भीती वाढली

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील गप्पेवाडी गावात बाराभाई वस्ती ते महादेव वस्ती या दरम्यान ३-फेज वीज लाईनची तार अक्षरशः जमिनीवर पडलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसा पासून ही परिस्थिती कायम असूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार,वीजतार खाली पडल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना व जनावरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
पावसाळा जवळ आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.ओलसर जमिनीमुळे विजेचा प्रवाह पसरू शकतो, ज्यामुळे अपघाताची भीती अधिक वाढली आहे.ग्रामस्थांनी याबाबत अनेक वेळा महावितरण कार्यालय, विडा येथे तक्रारी केल्या असल्याचे सांगितले जाते.मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?”असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या भागात शेतकरी, मजूर आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने रहदारी करत असतात.



