केज नगरपंचायत भ्रष्टाचाराने बरबटली ! ४.२४ कोटींचा घरकुल घोटाळा ; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल

केज/ प्रतिनिधी
केज नगरपंचायत भ्रष्टाचाराने बरबटली असुन ४.२४ कोटींचा घरकुल घोटाळा उघडकीस आला असून तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या सह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या केज नगर पंचायती मधील एका मोठ्या आर्थिक गैर व्यवहाराचा अखेर पर्दाफाश झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा तब्बल ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपयांचा निधी परस्पर इतर खात्यांवर वळवून अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह ६ जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी केवळपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक होते.मात्र,२० मे २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ याकालावधीत तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांनी पदाचा दुरुपयोग करत, लेखापाल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा कोट्यवधींचा निधी नियमबाह्य पद्धतीने लाभार्थ्यांऐवजी इतर खात्यांवर वर्ग केला.
चौकशीअंती घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच बीड जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली होती.उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती.या समितीने सखोल तपासणी करून आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.कोणतेही शासकीय निर्देशनसताना नियमबाह्यरीत्या रक्कम वर्ग केली गेली.केलेल्या अपहाराचा पुरावा नष्ट करण्यासाठी शासकीय कागदपत्रे आणिदस्तावेज गहाळ करण्यात आले.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
केज नगरपंचायतचे वर्तमान मुख्याधिकारी अजित गणपतराव ढोपे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी खालील सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे :
- मिलिंद सावंत तत्कालीन मुख्याधिकारी,
- सेवानिवृत्त असद इसाकोद्दीन खतीब (तत्कालीन लेखापाल),
- लक्ष्मण मारुती जगताप (कंत्राटी लेखापाल सहाय्यक),
- भास्कर एकनाथ ससाणे (व्हाॕल्वमन),
- भीमराव शामराव मस्के,
- बाशेद वलियोद्दीन काझी.
कायदेशीर कारवाई:
केज पोलीस ठाण्यात या सहाही आरोपीं विरुद्ध गु.र.नं.२३६/२०२६, भारतीय दंड विधान कलम ४०९ (शासकीय रकमेचा अपहार),४२० (फसवणूक),२०१ (पुरावा नष्ट करणे),२०४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनतेत संताप
हक्काच्या छपरासाठी प्रतीक्षा करणाऱ्या गरिबांचा पैसा अशा प्रकारे हडप झाल्याने केज शहरात संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि त्यांना साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यां वर तसेच इतर धेंडावर आता पोलीस काय कठोर कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



