धनेगाव येथील मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले ; नदीपात्रात ५२४१ क्युसेक्सने विसर्ग सुरू

केज/प्रतिनिधी
लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक १ च्या आदेशा नुसार,दि.२१ एप्रिल रोजी मांजरा धरणाचे (धनेगाव) दरवाजे उघडण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दुपारी ३ वाजता उघडले अतिरिक्त दरवाजे
धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३-०० वाजता गेट क्रमांक २ आणि ५ हे दोन दरवाजे उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची एकूण ६ वक्रद्वारे (क्र.१ ते ६) ०.२५ मीटरने उघडण्यात आली आहेत.
नदीपात्रात मोठा विसर्ग
या सहाही दरवाजांमधून मांजरा नदीपात्रात सध्या ५२४१.४२ क्युसेक्स (१४८.४४ क्युमेक्स) इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उन्हाळ्यात नदीला पाणी सोडण्यात आल्याने पात्रातील पाणी पातळी वाढणार आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मांजरा प्रकल्प धनेगाव पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठच्या आणि पुरामुळे बाधित होऊ शकणाऱ्या गावातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.नदीपात्रात उतरणे किंवा गुरेढोरे नेणे टाळावे,असे निर्देश कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग यांच्या वतीने देण्यात आले आहेत.तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन लातूर पाटबंधारे विभाग यांनी कळविले आहे.



