
केज/प्रतिनिधी
डोईफोडवाडी ता.बीड येथे वडजाई देवीच्या यात्रेनिमित्त पारंपरिक कुस्त्यांची भव्य दंगल मोठ्या उत्साहात पार पडली.यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेला परिसरातील ग्रामस्थ,तरुण मंडळी व कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.या दंगल सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे विजेत्या मल्लाला देण्यात येणारी चांदीची गदा होय.जिल्हा परिषद सदस्य श्री राणा डोईफोडे यांच्या हस्ते ही चांदीची गदा प्रदान करून कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला.त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
कुस्त्यांच्या मैदानात विविध गावांतील नामांकित मल्लांनी आपली ताकद आणि कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रत्येक कुस्तीला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.काही लढती अत्यंत चुरशीच्या ठरल्या असून,शेवटपर्यंत निकाल लागेपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
या कार्यक्रमात गावातील मान्यवर तसेच सर्व गावकरी मंडळी आणि तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला.यात्रेचे वातावरण भक्तीमय आणि उत्साहपूर्ण होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, युवक मंडळ व आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले. अशा पारंपरिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



