सामाजिक

आवसगाव जिल्हा परिषद शाळेला आयडीबीआय बँकेकडून सीएसआर निधीतून अत्याधुनिक आरओ पाणी शुद्धीकरण प्रकल्प भेट,शाखा व्यवस्थापक श्री.दिपक कोल्हे व सहकारी यांच्या हस्ते वितरण

केज/प्रतिनिधी

दि.४ एप्रिल रोजी आवसगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,आवसगाव येथे आयडीबीआय बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत अत्याधुनिक आर ओ पाणी शुद्धीकरण प्रकल्प प्रदान करण्यात आला. याउपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी आयडीबीआय बँकेचे बनसारोळा शाखा व्यवस्थापक दीपक कोल्हे,उप शाखा व्यवस्थापक आदित्य किसन तसेच कर्मचारी अतुल गोरे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक कस्पटे सर यांनी दीपक कोल्हे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,तर हंडीबाग सर यांनी आदित्य किसन यांचा सन्मान केला.देशमुख सर यांनी सर्व बँक कर्मचाऱ्यांचा गौरव करून आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रस्तावना आणि समारोप तानाजी जाधव सर यांनी प्रभावी व ओघवत्या शब्दांत सादर केला.यावेळी आवसगावचे सरपंच विश्वास शिनगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात शाळेच्या विकासासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली व बँकेचे आभार मानले.

आपल्या मनोगतात बँक शाखा व्यवस्थापक श्री. दीपक कोल्हे यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयडीबीआय बँक कटिबद्ध असल्याचे सांगितले.पुढील वर्षी सीएसआर निधीतून शाळेसाठी स्वच्छतागृह उभारणी तसेच विद्यार्थ्यां साठी डेस्क उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्यास त्यांचा शैक्षणिक दर्जा निश्चितच उंचावेल असे ते म्हणाले.

शाळेतील शिक्षकांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आरओ प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होईल,असा विश्वास व्यक्त केला. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात स्वच्छ पाण्याची उपलब्धता ही मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांच्या सहकार्या मुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे शाळेच्या विकासाला चालना मिळणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!