
केज/प्रतिनिधी
अंबाजोगाई पिपल्स को- ऑप बँकेने सन २०२५ – २०२६ मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे ३१ मार्च २०२६ अखेर बँकेने ६६५ कोटींच्या ठेवी जमवत वर्षाअखेरीस शुन्य नेट एनपीए राखण्यात यश मिळवले आहे.त्याबरोबर बँकेस ५ कोटी २६ लक्ष रूपयांचा निव्वळ नफा मिळाला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
बँकेने मिळविलेले आजचे हे यश दिवंगत लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, दिवंगत लोकनेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,दिवंगत लोकनेते माजी आमदार बाबुरावजी आडसकर तसेच माजी कृषिमंत्री आ.धनंजयजी मुंडे साहेब,माजी आमदार अमरसिंहजी पंडित साहेब यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन,मोलाची मदत व सहकार्य लाभले आहे. या सोबतच बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, ठेवीदार,कर्जदार,भाग धारक,ग्राहक,हितचिंतक तसेच सभासदांच्या सातत्यपूर्ण विश्वास व सहकार्याच्या भावनेमुळे च शक्य झाले असल्याचे देखील या पत्रकात नमूद केले आहे.मार्च २०२६ अखेर बँकेची एकूण सभासद संख्या १३,१५८ एवढी असून त्याच्या बळावरच बँकेच्या सभासद तथा ग्राहक बांधवांना मार्च २०२६ अखेर रू.३६९ कोटी इतके कर्जवाटप केले आहे.
या आर्थिक वर्षाचे रू.२१ कोटी एवढे भाग भांडवल असून बँकेचा स्वनिधी रू.५४ कोटी एवढा आहे.त्याच बरोबर वर्ष अखेरीस बँकेनेएकूण रू.३५० कोटी एवढी गुंतवणूक केली आहे.३१ मार्च २०२६ अखेर बँकेने एकूण ठेवी रू.६६५कोटी इतक्या जमा केलेल्या आहेत.सर्व ठेवींना विमा संरक्षण आहे.गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १३०कोटी रूपयांची व्यवसायात वाढ झाली आहे.स्थापने पासून बँकेने लेखा परिक्षण वर्ग-अ कायम राखला आहे.
तर अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेने मार्च २०२६ अखेर तब्बल १ हजार ३२ कोटींचा एकूण बँकिंग व्यवसाय केला असून शुन्य टक्के नेट एनपीए राखण्यात बँकेस यश आले आहे. तर बँकेने ३१ मार्च २०२६ अखेर ५ कोटी २६ लक्ष रूपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.सर्व क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती पाहता उत्तम टीमवर्क व सांघिक कामगिरीमुळे बँकेस हे प्रगतीचे उद्दीष्ट साध्य करता आले असल्याचे बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी,उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी व मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.
मार्च २०२६ अखेर बँकेची प्रगती ही बँकेच्या पुढील वाटचालीस नवीन उभारी देणारी असून बँकेच्या सभासदांनी व ग्राहकांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवल्याची पावती असल्याचे देखील मोदी यांनी नमूद केले आहे. चालू आर्थिक वर्षात अनंत अडचणी येऊनही बँकेच्या वसुली विभागाने समाधानकारक काम करीत बँकेचा निव्वळ एनपीए शुन्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे.देशातील सद्य आर्थिक परिस्थितीत देखील कर्जधारक, ग्राहकांचा विचार करून बँकेने सुरळीत व पारदर्शक आर्थिक व्यवहार करीत बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक ठेवण्यास यश मिळवले आहे असे मत बँकेचे संस्थापक अध्यक्ष मोदी यांनी व्यक्त केले.
बँकेचे सर्व सभासद,ग्राहक यांचा विश्वास,बँकेचे संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन व बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वृंदांचे नियोजनबध्द कामकाज यामुळे सन २०२५-२०२६ मध्ये चांगले कामकाज करणे शक्य झाले आहे.अशीच कामगिरी पुढील आर्थिक वर्षातही कायम ठेवण्याचा बँकेचा प्रयत्न असेल अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष मोदी यांनी दिली आहे.१९९६ साली केवळ एका शाखेद्वारे अतिशय अल्पशा भांडवलावर सुरू झालेली अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक आज ६६५ कोटीठेवींच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या बीड,लातूर, धाराशिव,छत्रपती संभाजीनगर,पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांत २१ कार्यरत शाखा व २ विस्तारित कक्ष अशा एकूण २३ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर व दर्जेदार बँकिंग सेवा देत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या केज,मुरूड व निलंगा या ठिकाणी बँकेच्या नवीन तीन शाखा अहवाल वर्षात कार्यरत झाल्या आहेत.रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांच्या आधीन राहूनच अंबाजोगाई पिपल्स बँक आजपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार करीत आहे.म्हणूनच रिझर्व्ह बँकेने नवीन शाखा सुरू करण्यास परवानगी दिल्याचे मोदी यांनी या पत्रकात नमूद केले आहे.अंबाजोगाई पिपल्स बँक अर्थकारण करीत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.ज्यामध्ये शहरातील गुणिजनांचा सन्मान,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण याबरोबरच महिलांसाठी बँकिंग प्रशिक्षण शिबिर,विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात बँक अग्रस्थानी असते.
या व अशा इतर अनेक कारणांमुळे अंबाजोगाई पिपल्स बँक ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे समाधान बँकेचे अध्यक्ष मोदी यांनी व्यक्त केले आहे.यापुढेही बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी,सन्माननीय संचालक प्रा.वसंतराव चव्हाण, अॕड.विष्णुपंत सोळंके,पुरूषोत्तम चोकडा,सुरेश मोदी, अॕड. सुधाकर कराड, संकेत मोदी,शेख दगदुभाई शेख दावल, सुधाकर विडेकर,प्रकाश लखेरा,हर्षवर्धन वडमारे, श्रीमती वनमाला रेड्डी, सौ.स्नेहा हिवरेकर, सुनिल राजपुरोहित, सचिन बेंबडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे, सर्व अधिकारी,शाखाधिकारी, कर्मचारीवृंद,पिग्मी एजंट यांच्या सहकार्याने अर्थकारणा सोबतच वारंवार असेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतील असा संकल्प बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला आहे.



