प्रशासनाकडून ठोस आश्वासन ;केज मधील घरकुल घोटाळा विरोधी अन्नत्याग आंदोलन स्थगित,तहसीलदारांच्या मध्यस्थीने भाई मोहन गुंड यांनी सोडले उपोषण;१५ दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे संकेत

केज/प्रतिनिधी
केज नगरपंचायतीमधील बहुचर्चित घरकुलघोटाळा आणि शहरातील इतर प्रलंबित प्रश्नांवरून शेतकरी कामगार पक्षपक्षाच्या वतीने सुरू असलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन अखेर सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. तहसीलदार राकेश गिड्डे यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून लेखी आश्वासनासह मध्यस्थी केल्यानंतर,भाई मोहन गुंड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपोषण सोडले.
आंदोलनाचा घटनाक्रम आणि वाढता दबाव
नगरपंचायती मधील भ्रष्टाचार आणि जन हिताच्या मागण्यांसाठी २७ मार्चपासून भाई मोहन गुंड यांनी हे आंदोलन छेडले होते.या आंदोलनाला दिवसेंदिवस धार चढत गेली.
व्यापक पाठिंबा:
शिवसेना (शिंदे गट), रिपाई (आठवले गट), मनसे,संभाजी ब्रिगेड, भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि टू व्हीलर असोसिएशन यांसारख्या संघटनांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून आंदोलनाला बळ दिले.
रास्ता रोको आंदोलन
बुधवारी सकाळी करण्यात आलेल्या ‘रस्ता रोको’मुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता.आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता.
प्रशासकीय मध्यस्थी आणि आश्वासन
बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार राकेश गिड्डे यांनी उपोषणस्थळी धाव घेतली.त्यांनी उप जिल्हाधिकारी दीपक वाजळे यांच्याशी आंदोलकांचे फोनवरून बोलणे करून दिले.या चर्चेत प्रशासनाने खालील महत्त्वाचे मुद्दे मान्य केले
गुन्हे दाखल होणार:
घरकुल घोटाळ्यातील सर्व दोषींवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक:
येत्या १५दिवसांत बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांचा निकाल लावणे.
नगरपंचायत प्रश्न:
केज शहरातील अंतर्गत समस्या १५ दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे आश्वासन. “प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली असून १५ दिवसांची मुदत मागितली आहे. जर या काळात ठोस कार्यवाही झाली नाही, तर आम्ही पुन्हा एकदा अधिक तीव्रतेने रस्त्यावर उतरू.”- भाई मोहन गुंड, शेकाप नेते.
यांनी घेतले विशेष परिश्रम
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हनुमंत भोसले,जिल्हा चिटणीस भाई ॲड.नारायणराव गोले पाटील,कपिल मस्के,भाई अशोक रोडे, ॲड.निखिल बचुटे, फिरोज पठाण,श्याम चिंचोलकर,कविराजगुंड, भाई मुंजाबा पांचाळ, नासेर मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सहकार्य केले.शेवटी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी प्रशासनाचे आभार मानून आंदोलनाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.



