बलात्कार व मारहाण प्रकरणातील आरोपीला केज न्यायालयाकडून जामीन मंजूर

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडिते सोबत जबरदस्तीने मारहाण करून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला केज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. मधुकर मस्के असे या जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
या संदर्भात अधिक माहिती अशी की,आरोपी मधुकर मस्के याच्या विरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं.३२६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ (B.N.S.) च्या कलम ३३३,११५ (२),७५,७६,७८,७९,६४, ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारी नुसार,आरोपीने तिला जबरदस्तीने मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप होता.या गंभीर गुन्ह्याखाली आरोपीला अटक करण्यात आली होती.न्यायालयीन प्रक्रिये मध्ये आरोपी मधुकर मस्के याने केज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामीन मिळवण्यासाठी अर्ज क्र.६५/२०२६ दाखल केला होता.या अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्या नंतर,न्यायालयाने आरोपीला अटी व शर्तीं सह जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. डी.बी.बिक्कड आणि ॲड. आशिषकुमार टोपे यांनी न्यायालयात प्रभावीपणे काम पाहिले. त्यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.या निकाला कडे परिसरातील कायदे तज्ज्ञांचे लक्ष लागले होते.



