गुन्हेगारी

माणुसकीच्या नात्याला काळिमा!केज तालुक्यात नराधम चुलत्याकडून विवाहित पुतणीवर अत्याचार

केज/प्रतिनिधी

रक्ताच्या नात्याला आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे.एका ५० वर्षीय नराधम चुलत्याने आपल्या २५ वर्षीय विवाहित पुतणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

गुंगीचे औषध देऊन कृत्ये

मिळालेल्या माहिती नुसार,पीडित २५ वर्षीय विवाहित तरुणी दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी केज तालुक्यातील एका गावात आपल्या माहेरी आली होती.दुपारी १-३० ते ३-३० वाजण्याच्या सुमारास,शेजारीच राहणाऱ्या तिच्या नात्याने चुलताअसलेल्या ५० वर्षीय आरोपीने तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले.तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर नराधमाने तिच्या हतबलतेचा फायदा घेत तिच्यावर पाशवी अत्याचार केला.

जीवे मारण्याची धमकी आणि पाच महिन्यांचा दहशतवाद

अत्याचार केल्यानंतर या नराधम चुलत्याने पीडितेला अत्यंत क्रूरपणे धमकावले.जर ही घटना कोणाला सांगितली,तर तुझ्या आई-वडिलांना संपवून टाकीन अशी धमकी दिल्याने पीडिता प्रचंड दहशतीखाली होती.या भीतीपोटी तब्बल पाच महिने पीडितेने हा मरणयातना देणारा प्रसंग मनातच दडवून ठेवला होता.

पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

मात्र,अखेर पीडितेने धीर एकवटून आपल्या आई- वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबाच्या पाठिंब्यानंतर शनिवारी सायंकाळी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (२) (एफ),कलम ३५१ (२) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ६८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी फरार, पोलिसांची पथके रवाना

घटनेची वाच्यता होताच आरोपी फरार झाला असून तो जिल्ह्याबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शना खाली उप निरीक्षक भारत बर्डे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्या साठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.या घटनेमुळे संपूर्ण केज तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!