विडा येथे धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गर्दभ सवारी उत्साहात ;सत्तरी उलटलेले शिवाजीराव गालफाडे यांना मिळाला अनपेक्षित मान

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील विडा गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जावयाची गर्दभ सवारी ही आगळी वेगळी आणि हास्यविनोदाने नटलेली पारंपरिक प्रथा मंगळवार,दि.३ मार्च २०२६ रोजी मोठ्या जल्लोषात पार पडली. यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सत्तरी उलटलेले शिवाजीराव गालफाडे यांना अनपेक्षितपणे मानकरी म्हणून गौरविण्यात आले.
ग्रामीण संस्कृतीत जावयाला मानाचे स्थान देत त्याच्यावर प्रेमळ चेष्टा करण्याची ही परंपरा विडा गावात अनेक वर्षांपासून जपली जात आहे.साधारणपणे गावात आलेल्या जावयाची निवड करून त्याची सजवलेल्या गर्दभावरून मिरवणूक काढली जाते.मात्र यंदा घडलेल्या घडामोडींमुळे कार्यक्रमात वेगळाच रंग भरला.मिळालेल्या माहिती नुसार, सुरुवातीला धरून आणलेला जावई अचानकपणे निसटल्या मुळे गावकऱ्यांमध्ये थोडी धावपळ उडाली.
त्यानंतर दुसरा जावई पकडून आणण्यात आल्याने कार्यक्रम पार पडेल,असे सर्वांना वाटत होते. मात्र याच दरम्यान गेली साठ वर्षे विडा गावात वास्तव्यास असलेले शिवाजीराव गालफाडे यांना गावकऱ्यांनी अचानकपणे मानकरी म्हणून निवडले.स्वतः शिवाजी गालफाडे यांनाही आपणच गर्दभ सवारीचे मानकरी ठरू, याची अजिबात कल्पना नव्हती.आपल्याला पकडतील आणि आपलीच गर्दभ सवारी काढतील असे त्यांना वाटले नव्हते,कारण दुसरा जावई आणल्या मुळे आपल्यावर वेळ येणार नाही,अशी त्यांची समजूत होती.परंतु गावकऱ्यांनी हसतखेळत त्यांना सजवून गर्दभावर बसवले आणि ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक काढली.
महिलांच्या उखाणे, पारंपरिक ओव्या,टाळ -मृदुंगाच्या नादात आणि तरुणांच्या जल्लोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शिवाजीराव गालफाडे यांनीही हा मान आनंदाने स्वीकारत परंपरेचा सन्मान राखला.
गावकऱ्यांच्या मते,अशा लोकपरंपरांमुळेच बीड जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख अधिक उठून दिसते.नातेसंबंधातील स्नेह,आपुलकी आणि सामाजिक ऐक्य जपणारी ही प्रथा आजही तेवढ्याच उत्साहात साजरी होत असल्याचे चित्र विडा येथे पाहायला मिळाले.विडा ग्रामस्थांनी ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला. अनपेक्षित वळणा मुळे रंगलेली यंदाची जावयाची गर्दभ सवारी ग्रामस्थांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.दरम्यान शिवाजीराव गालफाडे यांच्या चिरंजीव यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,एकीकडे थोडे दुःख वाटते परंतु गावाची प्रथा परंपरा चालू राहीली पाहिजे म्हणून सहमती दर्शवली आहे.



