शिवसेना संघटन मजबूत करा प्रत्येक घरात शिवसेना पोहचवा – ना. संजय सिरसाट छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी

केज/प्रतिनिधी
शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांचा भव्य संवाद मेळावा व पक्षप्रवेश सोहळा शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता मुक्ताई लॉन्स,केज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री मा. श्री.संजय शिरसाट साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. मनोज शिंदे साहेब,जिल्हा व तालुका पदाधिकारी, मराठवाडा विभागातील नेते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना उपनेत्या तथा माजी आमदार प्रा. सौ.संगीताताई विजयप्रकाश ठोंबरे यांनी अलीकडेच शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर केज शहराच्या विकासा संदर्भात महत्त्वाचे प्रश्न प्राधान्याने मांडले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या केज शहरातील पुतळ्याचे सन्मानपूर्वक पुनर्स्थापना व सुशोभीकरण व्हावे, तसेच चौकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.यासाठी प्रा.संगीताताई ठोंबरे यांनी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री मा.श्री.संजय शिरसाट साहेब तसेच शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री.मनोज शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पत्राद्वारे निधीची मागणी केली होती.
निवेदनात स्मारक परिसराची झालेली पडझड,आवश्यक सुविधांचा अभाव,तसेच शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक भावनांशी निगडित असलेले महत्त्व यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला होता.या पाठपुराव्याची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री मा. श्री.संजय शिरसाट साहेब यांनी मेळाव्यात जाहीर केले की,राज्य शासनाच्या वतीने केज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत आहे. तसेच लवकरच अधिकृत मंजुरी पत्रही निर्गमित होणार असल्याचीमाहिती त्यांनी दिली.
१९ फेब्रुवारी शिवजयंती च्या पावन मुहूर्तावर हा निर्णय जाहीर होणे हे केजमधील शिवप्रेमींसाठी एक विशेष उपहार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.केज विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारे स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे. या निधीमुळे स्मारकाचे आधुनिकीकरण, परिसराचे सौंदर्यीकरण, प्रकाश व्यवस्था, बसण्याची व्यवस्था व अन्य विकासकामे मार्गी लागणार आहेत.त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवे बळ मिळणार असून भावी पिढ्यांना प्रेरणास्थान अधिक भव्य स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

संवाद मेळाव्यात पक्ष संघटन अधिक बळकट करणे, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे,स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि शिवसेनेची विचारधारा जनतेपर्यंत अधिक सक्षमपणे पोहोचवणे यावर भर देण्यात आला.मा.आ.प्रा. संगीताताई ठोंबरे यांनी केज तालुक्यातील बेरोजगारी, पाणीटंचाई आणि इतर स्थानिक प्रश्न मांडून शासन स्तरावर ते सोडविण्याचा निर्धारव्यक्त केला.या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले.या ऐतिहासिक निर्णयामुळे केज तालुक्यात पक्ष संघटन अधिक बळकट होईल आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल,असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
संग्राम विजय केंद्रे –युवा सेना उप जिल्हा प्रमुख बीड (केज विधानसभा) संग्राम विजय केंद्रे यांनी शिवसेना प्रवेश केला त्यांच्या सोबत अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी संग्राम केंद्रे यांना युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुखपदी निवड करून केज विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.



