विद्यार्थ्यांनी चांगला माणूस व्हावे.- डॉ.हनुमंत सौदागर रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न


केज/प्रतिनिधी
जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही यश संपादन करता येते.मात्र फक्त यशस्वी नव्हे तर चांगला माणूस होणे अधिक महत्त्वाचे आहे असे प्रेरणादायी मत डॉ. हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले.ते केज शहरातील रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.खोसे सर हे होते.यावेळी शिक्षक वर्ग,विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवार रोजी दहावीचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन करत स्वयंशासन दिन साजरा केला.या उपक्रमासाठी वर्गशिक्षिका श्रीमती गिरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत शाळेचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले.निरोप समारंभात श्री.देशमुख,श्रीमती डॉ. गिरी,श्री.गोरे,श्री. गायकवाड आणि श्री. नाईकनवरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.पुढे बोलताना डॉ.सौदागर यांनी विद्यार्थ्यांना स्व अनुशासनाचे महत्त्व पटवून दिले.
अभ्यास करताना एकाग्रता आणि अवधान किती आवश्यक आहे यावर त्यांनी विशेष भर दिला.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणे सोपे झाले असून, अशा परिस्थितीत अवधान टिकवणे ही मोठी कसरत असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक श्री.खोसे सर यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला.
जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास,परिश्रम आणि योग्य दिशा महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक कदम यांनी केले, तर संपूर्ण नियोजन नववीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळले.कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती उगले यांनी उपस्थितांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत त्यांना नव्या वाटचालीसाठी प्रेरणा दिली.



