प्रशासकीयसामाजिक

केंद्र शासनाच्या योजना राबविताना समन्वय महत्वाचा घटक-खासदार बजरंग सोनवणे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) सभा संपन्न

बीड/प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या योजना जिल्ह्यात राबवताना सर्व यंत्रणांनी समन्वय राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) सभेत केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात समितीची सभा खासदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी जतिनरहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक संगीता पाटील, समितीचे सदस्य मोहन जगताप,अंजली आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आवास योजनेत कौतुकास्पद काम

जिल्हा परिषद अंतर्गत पंतप्रधान आवासयोजनेचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांनीयंत्रणेचे यावेळी अभिनंदन केले. यात पुढील काळासाठी वाढीव उद्दिष्ट जिल्ह्यास प्राप्त झाले आहे याबाबत योग्य ते नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.जी कामे २०१६ पासून प्रलंबित दिसत आहेत आणि ती विविध कारणांमुळे होणे शक्यच नाही ती कामे वगळा अशीही सूचना त्यांनी दिली.अंगणवाडी विकासासाठी ग्रामीण विकास आणि जिल्हा नियोजन निधी यातून सध्या ३७५ कामे हाती घेण्यात आली आहेत.ही कामे घेताना ज्या अंगणवाड्यांचे काम अत्यावश्यक आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे असे खासदार सोनवणे म्हणाले

प्रोत्साहन निधी वाढवा

स्वच्छता कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक शौचालय कामासाठी १२००० रुपये प्रोत्साहन निधी दिला जातो.यात गेल्या दहा वर्षात वाढ झालेली नाही याकडे लक्ष द्यावे,हा निधी ग्रामपंचायत देते त्यामुळे त्यात वाढ करण्यासाठी कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी केली.

प्रधानमंत्री पीक विमा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बोगस सातबारा दाखल करून ७७९२ जणांनी पिक विमा उचलला हे स्पष्ट झाले आहे.याबाबत आतापर्यंत गुन्हे दाखल का झाले नाही ? अशी विचारणा करून खासदार सोनवणे यांनी यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही लवकर करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यात कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत १,३८,४५२ अर्ज शेतकऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत.यातील १४,१२५ कामे पूर्ण झाले आहेत.याबाबतीत बीड जिल्हा अग्रक्रमावर आहे. सोबतच प्रधानमंत्री सुर्यघर योजना अंतर्गत जिल्ह्यात ७४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे असे सभेत सांगण्यात आले.

लखपती दिदी योजना

केंद्र सरकारच्या लखपती दिदी योजनेअंतर्गत ८८,२१५ इतके उद्दिष्ट प्राप्त झाले आहे,यात उद्दिष्टापलीकडे जात ८८,७१७ प्रकरणे पूर्ण झाले आहेत.वैयक्तिक शौचालय अंतर्गत ४६०० तर सार्वजनिक शौचालय अंतर्गत ३५५ कामे जिल्ह्यात प्रस्तावित आहेत.

दुहेरी देयक उचल बाबत चौकशी करा

रोजगार हमी योजना अंतर्गत झालेल्या कामात यंत्रणा आणि बांधकाम विभाग या दोन्ही बाजूने देयके उचलली गेली.यात जिल्ह्यात ९० लाख रुपयांच्या निधीची उचल झाली आहे,याबाबत यंत्रणांनी चौकशी करून आठ दिवसात अहवाल सादर करावा अशी निर्देश त्यांनी यावेळी दिले.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत २०२४-२५ साठी ३९८ कोटींचा विमा मंजूर झाला होता.त्यातील ३९७ कोटीच्या आसपास निधी शेतकऱ्यांना वर्ग झाला आहे.मात्र जिल्ह्यातील १०,५०० शेतकऱ्यांचे आधार वेरिफिकेशन झालेले नसल्याने एक कोटी नऊ लाख रुपये परत गेला आहे. याबाबत ची कार्यवाही पूर्ण करण्याचीही सूचना खासदार महोदयांनी बैठकीत केली.संसद सदस्यांना ज्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते तसे प्रशिक्षण नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना चांगले प्रशिक्षण द्या ज्यामुळे ग्रामीण विकास कामास गती प्राप्त होईल असे खासदार सोनवणे यावेळी म्हणाले.

वनविभाग घनकचरा व्यवस्थापक,पाणीपुरवठा,पशुसंवर्धन तसेचकेंद्राच्या योजना राबविणाऱ्या सर्व कार्यालयांच्या कामाचा आढावा या सभेत घेण्यात आला.ग्रामीण विकास यंत्रणा संचालक संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले तर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!