शैक्षणिकसामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रांतीनगर केज येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

केज/प्रतिनिधी

केज शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रांतीनगर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे सुयोग्य व नियोजनबद्ध आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शिनगारे सर यांनी केले होते.कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक शिनगारे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष,स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेले अमूल्य कार्य तसेच सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले योगदान यांचा सविस्तर व प्रभावी आढावा घेतला.

प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नसून सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.यावेळी शाळेच्य शिक्षिका श्रीमती सुतार मॅडम यांना यावर्षी जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांच्या गुणवत्तापूर्ण व विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवर व पालकवर्गाने त्यांचे मनापासून अभिनंदन केले.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.शितलताई लांडगे यांना येत्या ३१ जानेवारी रोजी नांदेड येथे राज्यस्तरीय “संघर्ष नायिका” पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.या गौरवाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.त्यांच्या संघर्षमय सामाजिक कार्याची माहिती उपस्थितां समोर मांडण्यात आली.

या कार्यक्रमाला आझाद क्रांती सेनेचे शहर प्रमुख इरफान पठाण तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते बाबुरावजी गालफाडे सर यांची आवर्जून उपस्थिती होती.त्यांच्या उपस्थिती मुळे कार्यक्रमाला सामाजिक प्रतिष्ठा व वजन प्राप्त झाले.यावेळी उपस्थित असलेले पत्रकार पांडुरंग कसबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांना बोलते केले.शिक्षण,वाचन आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले.प्रेम गायकवाड यांनीही कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती दर्शवली.

सदरील कार्यक्रमास क्रांतीनगर परिसरातील अनेक नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला लोक सहभागाचे व सामाजिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी एकत्रितपणे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध परिश्रमघेतले.सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा दृढ करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!