

बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील मौजे बोरफडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अनिमिया मुक्तगाव या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या उपक्रमाचे आयोजन सरपंच कैलास घुगे यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी डॉ.सय्यद यांनी अनिमिया (रक्त क्षय) आजाराबाबत मार्गदर्शन करताना महिलांमध्ये, बालकांमध्ये व किशोर वयीन मुलींमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. योग्य आहार,नियमित हिमोग्लोबिन तपासणी व आयर्नयुक्त औषधोपचार केल्यास अनिमिया प्रभावीपणे नियंत्रणात आणता येतो,असे त्यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी आरोग्यदृष्ट्या सक्षम गाव निर्मितीसाठीग्रामपंचायत, आरोग्य विभाग,आशा स्वयंसेविका वअंगणवाडी सेविका यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले. सरपंच कैलास घुगे यांनी गावातील सर्व घटकांची तपासणी करूनआवश्यक त्या उपचारांसह पोषण विषयक जनजागृती उपक्रम सातत्याने राबवून बोरफडी गाव अनिमिया मुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या शिबिरात गावातील महिलांची व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली व औषध उपचार केले.कार्यक्रमास विस्तार अधिकारी पारटकर सर,चांगन सर, युवाउद्योजक सुनील कुटे, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत अधिकारी गिते तसेच शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



