दारूच्या नशेत यंत्र चालकाची महिला अभियंत्याशी हुज्जत,केज पोलिसात गून्हा नोंद

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कानडीमाळी येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राची तपासणी करण्यासाठी गेलेल्या महिला अभियंता शीतल सय्यद यांच्याशी मद्याच्या अंमलाखाली असलेल्या यंत्रचालक शंकर ठोंबरे यांनी गैरवर्तन करून त्यांच्याशी हुज्जत घातली. याप्रकरणी महावितरण च्या कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद यांच्या फिर्यादी वरून यंत्रचालक शंकर ठोंबरे विरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद झाला आहे.
केज येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता शीतल वाजेद अली सय्यद या शुक्रवारी दि.14 नोव्हेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान कानडी माळी येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्राच्या तपासणीसाठी आल्या होत्या.यावेळी कर्तव्यावर असलेले यंत्रचालक शंकर ठोंबरे वय 46 वर्षे रा.केज यांनी महिला कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांच्या सोबत विनाकारण वाद घालून जोरजोरात आरडाओरडा केला.
त्यांचा दारू पिल्याचा वास येवू लागल्यामुळे शीतल सय्यद यांनी त्यांना तुम्ही दारू पिले आहात काय ? असे विचारले असता मी दारू पिलेलो नाही असे त्यांनी सांगितले.दरम्यान वैद्यकीय तपासणी करून घेण्याबाबत सांगितले असता त्यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास विरोध केला ही माहिती कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांनी त्यांचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांना कळविली व त्यानंतर दि. 15 नोव्हेंबर रोजी शंकर ठोंबरे यांना दारुपिण्याच्या संशयावरुन वैद्यकीय तपासणी करून घेण्या संबंधीचे पत्र दिले.
उपजिल्हा रुग्णालय केज येथे त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याचा अहवाल गुरूवारी दि.20 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला.त्या अहवालानुसार कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद यांच्या फिर्यादीवरून यंत्रचालक शंकर ठोंबरे यांच्या विरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद झाला आहे.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार त्रिंबक सोपने हे पुढील तपास करीत आहेत.
रक्ताचे नमुने प्रयोगशाळेला पाठविले
या प्रकरणी केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा अन्सारी यांचेशी संपर्क साधला असता शंकर ठोंबरे यांच्या रक्ताचे नमुन्याची येथे तपासणी करून छत्रपती संभाजी नगर येथील फॉरेन्सिक लॅब कडेही सदर रक्ताचे नमुने पाठविण्यात आले असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली. गोपनीयतेचा भाग असल्यामुळे या बद्दलची माहिती तुम्हाला सांगता येणार नाही.याचा वस्तूनिष्ठ अहवाल पोलिसांना पाठविल्याचे ही यावेळी त्यांनी सांगितले.



